loader image

संपादकीय

Sep 9, 2021


अरे पुन्हा आयुष्याच्या…पेटवु मशाली…! 

६ जानेवारी १९९० साली पत्रकार दिनाचे औचित्य साधत मनमाड शहरातील जनतेच्या विविध प्रश्नांना सर्वसमावेशक प्रसिध्दी देत प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचे माध्यम ठरलेल्या साप्ताहिक मनमाड ठिणगीच्या प्रथमांक शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला. 

पाणीटंचाईचे शहर अशी संपुर्ण राज्यभर ख्याती असलेले कामगार वस्तीचे शहर मनमाड. शहराने बरेच चढउतार अनुभवले आहेत, पाण्याच्या प्रश्नामुळे आजही शहराची परिस्थिती भयावह झालेली आहे. पाणीप्रश्नाबाबत राजकारांची उदासिनता याचे एक प्रमुख कारण आहे. एफ.सी.आय.चे धान्य गोडाऊन, रेल्वे कारखाना, रेल्वे जंक्शन, पेट्रोलियम कंपन्या या जमेच्या बाजु असतांना देखील राजकीय उदासीनतेचा फटका या शहराला सोसावा लागला आणि याचा थेट परिणाम शहराच्या बाजारपेठेवर झाला. साप्ताहिक मनमाड ठिणगीने वेळोवेळी मनमाडच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत बातम्या प्रसिध्द केल्या आहेत. 

कालांतराने महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळ, मुंबई या संस्थेच्या मुखपत्राची धुरा सा.ठिणगीने यशस्वीरित्या पार पाडली. संपुर्ण महाराष्ट्रातील सराफ सुवर्णकार बांधवांच्या विविध प्रश्नांना योग्य ती प्रसिध्दी देत शासनापर्यंत पोहचविण्याचे काम सा.ठिणगीने मध्यंतरी केले. कलम ४११ असो, पोलीसी कारवाई असो, केंद्र सरकारची किचकट कर प्रणाली असो, प्रत्येक क्षणी ठिणगीने पुढाकार घेत व्यापारी बांधवांच्या समस्या शासनापर्यंत पोचविल्या आहेत. 

प्रिंट मिडीया असो वा इलेक्ट्रॉनिक मिडीया असो, आजकालचे युग हे “टचस्क्रिन’ आहे. सेकंदात बातम्या, शहरातील घडामोडी, वाचकापर्यंत पोहचविण्यासाठीच या डिजीटल ठिणगीचा प्रयोग सुरु करीत आहोत. मनमाडकरांनी ‘ठिणगी’वर सुरुवातीपासुनच प्रेम व्यक्त केलेले आहे. जाहिरातींचे पाठबळ प्रत्येकक्षणी उभं केलेले आहे. 

‘समय के साथ चलो’ या म्हणीप्रमाणे साप्ताहिक मनमाड ठिणगी आपल्या पोर्टलच्या माध्यमातुन आपणा सर्वांपर्यंत पोहचण्याचा एक प्रयत्न करीत आहोत. हवे आहेत फक्त आपले आशिर्वाद, पाठबळ अन् सदिच्छा. 

गत दिड वर्षांत कोरोना विषाणुचा जो कहर संपुर्ण जगावर झाला त्याचे आघात मनुष्य प्राणी कदापिही विसरु शकत नाही. सर्वच क्षेत्रांत या विषाणुच्या प्रादर्भावामुळे पिछेहाट झालेली दिसुन येते. याच काळात ‘ऑनलाईन खरेदी के घरपोच सेवा’ देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यानी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केल्यामुळे स्थानिक बाजारपेठेवर याचा खुप मोठा विपरीत परिणाम झाला. 

व्यापारी बांधवांची आजची खरी गरज लक्षात घेऊन मनमाड ठिणगीच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे स्थानिक व्यापारी प्रतिष्ठाणांना नवसंजीवनी देण्याचा एक छोटास प्रयत्न आम्ही करीत आहोत. या पोर्टलद्वारे स्थानिक व्यापारी आपल्या व्यापाराची जाहिरात आपल्या दुकान बसुन ऑनलाईन पध्दतीने करू शकतात व यामुळे व्यापारी बांधवांच्या व्यवसायाला गतवैभव प्राप्त होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल व त्यासाठी जो खर्च येणार आहे तो सुध्दा नाममात्रच आहे. 

लवकरच मनमाड, नांदगांव, येवला, लासलगांव, चांदवड व मालेगांवच्या व्यापारी बांधवांचा देखील पोर्टलमध्ये समावेश करण्यात येणार आहे, जेणे करुन स्थानिक ग्राहकांना देखील खरेदीसाठी एक मोठे व्यासपीठ व व्हरायटी उपलब्ध होईल. ही संकल्पना नक्कीच व्यापारी बांधवांना आवडेल व त्यांच्या व्यवसायाला नवसंजीवनी देणारी ठरेल, हीच अपेक्षा. – मनमाड ठिणगीतर्फे सर्वांना ‘श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 


अजून बातम्या वाचा..

No Results Found

The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.

.