इंटरऍक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी तसेच पंचायती टाइम्स न्यूज पोर्टलतर्फे गुरुवारी (दि. 30) राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांसह 35 जणांना उल्लेखनीय कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने माजी आमदार राज पुरोहित यांनी पुरस्कार स्वीकारला.
हॉटेल ताज महाल मुंबई येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन इंटरऍक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी तसेच पंचायती टाइम्स न्यूज पोर्टलतर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाला फोरमचे अध्यक्ष नंदन झा व ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक उपस्थित होते. यावेळी बोलताना समाजात परिवर्तन अनेक लोकांच्या सामूहिक प्रयत्नातून घडत असते. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील अग्रणी लोकांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन योगदान देणे आवश्यक असते. विविध क्षेत्रातील चॅम्पियन्स समाजासाठी प्रेरणास्रोत असून त्यांनी आपापल्या क्षेत्रांत अधिकाधिक योगदान दिल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन निश्चितपणे येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.










