नाशिक : नाशिकचे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्राण्यांसाठीच्या अभिनव ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण सोमवारी (दि. ०४) केंद्रीय रस्ते विकास आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
मुक्या प्राण्यांना त्यांच्या आजारपणात अथवा जखमी झाल्यास रुग्णालयात नेण्यासाठी किंवा अपघात स्थळावरून नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध नाही. या विचारातून ही रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. नितीन गडकरी तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या संकल्पनेचे कौतुक करीत चंदे यांच्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त कैलास जाधव उपस्थित होते. ही रूग्णवाहिका नाशिक महापालिकेकडे सुपुर्द करण्यात आली. गुजरातमधून विशेषत्वे हायड्रोलिक ट्रॉलीच्या सुविधेसह तयार केलेली सुसज्ज अशा या अभिनव ॲम्ब्युलन्ससाठी ३० लाख रुपयांचा निधी खर्च झाला असून दर महिन्याला ॲम्ब्युलन्ससाठी लागणारा खर्च देखील चंदे हेच करणार आहेत.











