दीपावली उत्सव काही दिवसांवर आला असताना केंद्र सरकारने दिवाळी आधीच केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता आता ३१ टक्के होणार आहे. या निर्णयाचा देशभरातील सुमारे ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख निवृत्तिवेतनधारकांना लाभ होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे ९ हजार ४८८ कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे. केंद्राने कोरोना महामारीमुळे महागाई भत्ता रोखला होता. त्यानंतर यावर्षी जुलैमध्ये सरकारने महागाई भत्ता आणि ‘डीआर‘ पूर्ववत केला होता.












