ज्या राज्याचे आपण आज मंत्री आहात, त्या राज्यात फक्त शिवसेनेमुळेच तुम्हाला मंत्रिपद मिळाले आहे हे विसरू नये, असा खोचक टोला आज नांदगाव येथील मेळाव्यात शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना लगावला. आज तुमच्याकडे नाशिकमध्ये लाल दिवा आहे तो उद्या नांदगावला देखील लाल दिवा येईल, भुजबळानी आता समानता ठेवावी, नांदगावचा नाद आता सोडावा, कारण आता आम्ही नांदगावचा भगवा खाली उतरू देणार नाही, असेही राऊत यांनी पुढे सांगितले.
गेल्या महिन्यात निधी वाटपावरून भुजबळ आणि कांदे यांच्यात जोरदार वाद झाला होता, त्या पार्श्वभूमीवर राऊत यांचा हा दौरा महत्वाचा मनाला जात होता, राऊत यांनी थेट भुजबळांवर आरोप न करता सुहास कांदेंची बाजू घेत छगन भुजबळ यांना नांदगाव मतदार संघ सोडण्याचा सल्ला देताना सुहास कांदे यांना भविष्यात मंत्रिपद देण्याचे सुतोवाच देखील केले.
सुहास कांदे यांनी मतदार संघात कोविड काळात केलेल्या कामाचे देखील राऊत यांनी विशेष कौतुक केले. नांदगाव मतदार संघाला सुहास कांदे यांच्या रूपाने मतदार संघाला विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले असल्याचे देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.








