राज्यातील एसटीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपात मनमाड बस आगारातील चालक-वाहकांनीही पुन्हा जोर धरत आज पासून चक्का जाम केला . आज सकाळपासून मनमाड बसची चाके थांबल्याने भाऊबीजेला माहेरी निघालेल्या बहिणीची वाट बिकट झाली असतांनाच .खासगी वाहनांचा आधार प्रवाशांना घ्यावा लागत असल्यामुळे सकाळपासूनच मनमाड बस स्थानकावर शुकशुकाट बघावयास मिळाला.
मनमाड आगारातील सुमारे तिनशेच्यावर कर्मचाऱ्यांनी बस बंदचा पवित्रा घेतल्याने येथील वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली. चालक-वाहकांनी संपात उडी घेत ऐन भाऊबिजेला बसचे चाक बंदचा निर्णय घेतल्याने प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत . मनमाड, येवला, कोपरगाव, अहमदनगर, पुणे, मालेगाव, धुळे, नंदुरबार, सुरत,अहमदाबाद नाशिक, चांदवड, नांदगाव,जळगाव ,भुसावळ व अन्य काही भागाकरिता परतीच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. आज सलग मनमाड बस आगाराच्या ३३ नियमित फेऱ्या तर ८४ एकत्रित फेऱ्या आता रद्द करण्यात आल्या आहे. बसस्थानकात पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत असून संपकरी कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत एसटी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत अनेक प्रवासी खासगी वाहतुकीचा पर्याय निवडत आहेत. खासगी वाहतूकदार प्रवाशांची लूट करत असल्याचे चित्र आहे. . मनमाड बस आगारातून ग्रामीण भागासाठी अनेक बस सोडल्या जातात. त्यामुळे बसस्थानकात ग्रामीण भागातून आलेल्या प्रवाशांची गर्दी बघावयास मिळाली. विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही त्यामुळे बस फेऱ्या बंद करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.