चांदवड तालुक्यातील पाटे येथे दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची अतिशय ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ओम तळेकर आणि प्रणव तळेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच अख्ख्या गावात शोककळा पसरली. आपली दोन्ही मुळे शेततळ्यात बुडाल्याचे समजताच शेतकरी संजय तळेकर आणि त्यांच्या पत्नीने एकच आक्रोश सुरू केला. आई-वडिलांचा आकांत पाहून गावकरीही हेलावून गेले.
पाटे येथील शेतकरी संजय किसन तळेकर यांना दोन मुले आहेत. त्यात ओम हा 13 वर्षांचा असून, दुसरा मुलगा प्रणव. तो 11 वर्षांचा आहे. सध्या कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या शाळा बंद आहेत. हे दोघे भाऊ घरातील शेळ्या शेतात चारायला घेऊन गेले होते. शेळ्या नाल्याजवळ गेल्या. तिथून जवळच पुढे शेततळे होते. त्यांनी शेततळ्याकडे पळ काढला. शेळ्यांना वळवायचे म्हणून लहान प्रणव शेततळ्यावर गेला. मात्र, त्याचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. आपला लहान भाऊ शेततळ्यात पडल्याचे दिसताच ओमने मागचा पुढचा विचार न करता शेतळ्यात उडी मारली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.











