नाशिक महापालिकेच्या बेपत्ता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. सुवर्णा वाजे यांचा खूनच झाला असून त्यांचा पती संदीप वाजे याने काही साथीदारांच्या मदतीने कट रचून हा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी संदीप वाजे याला ताब्यात घेतलं असून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वाडीवऱ्हे परिसरात दहा दिवसांपूर्वी एका कारमध्ये सुवर्णा वाजे यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. सुवर्णा वाजे यांची हत्या की आत्महत्या अशी चर्चा सुरू असतानाच नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या पथकाने अवघ्या दहा दिवसांत या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करत संदीप वाजे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संदीप वाजे यांचे सुवर्णा यांच्यासोबत कौटुंबिक वादविवाद होत असत. त्या रागातूनच संदीप वाजेने हा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. संदीप वाजे याच्या व्यतिरिक्त या कटात आणखी किती जणांचा सहभाग आहे हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, या संशयितांचा शोध सुरू आहे.













