साक्षात दैवी अनुभूती
मी ऐकलय प्रत्यक्ष लता दीदींना
आयुष्यात जे काही थोडे बहुत भाग्याचे क्षण आले , त्यात साक्षात गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या समोर त्यांना ऐकण्याचा आलेला सुवर्ण क्षण….. दैनिक देशदूत मध्ये काम करत असताना आळंदी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वार्तांकन करण्याची जबाबदारी संपादकांनी सोपवली. अध्यक्षा होत्या कवयित्री शांता शेळके… आळंदीत इंद्रायणी काठी
रात्री मंगेशकर कुटुंबियांचा अमृताचा धनू हा रात्री कार्यक्रम…., इंद्रायणीत दिवे सोडलेले, कार्यक्रमाची सर्वांना आस सर्व पुणे लोटलेले…. हृदयनाथ
मंगेशकर व उषा मंगेशकर यांनी संत परंपरेतील अनेक संतांच्या रचना सादर करुन सर्वांना जिंकले. लता दीदी खास प्रेक्षकात उपस्थित…आम्ही स्टेज समोर पहिल्या रांगेत… या स्वर्गीय आनंदाची अनुभूती घेत होतो…आणि रात्री उशिरा कार्यक्रम संपता अचानक भारताची गानकोकिळा लता दीदी स्टेजवर आल्या व त्यांनी पसायदान म्हणायला सुरुवात केली. हजारो रसिक स्तब्ध झाले. साक्षात लता दीदींना थेट समोर पहिल्या रांगेत बसून ऐकण्याचा सुवर्ण योग आम्हाला आला.लता मंगेशकर यांचे दैवी रूप व स्वर याची देहा याची डोळा अनुभवले. आणि अक्षरशः धन्य झालो. किती भाग्यवान किती श्रीमंत आपण हे तेव्हा कळले.
आज लता दीदी नाही,पण त्यांचे दैवी,जादुई स्वर आजही कानात गुंजत आहेत. थेट आळंदीत ज्ञानोबा रायाचे पसायदान इंद्रायणी काठी लता दीदींच्या तोंडुन ऐकण्याचा योग आला.
आणि ही मर्म बंधातील ठेव ठरली.
संदीप देशपांडे












