loader image

के. आर टी. हायस्कूलमध्ये प्रख्यात शिक्षणतज्ञ श्री. शरद दळवी यांची ‘ट्रिक्स टू फिक्स’ ही इंग्रजी आणि गणित या विषयांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

Jan 11, 2023


कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, मनमाड मध्ये इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विदयार्थ्यांसाठी प्रख्यात शिक्षणतज्ञ श्री. शरद दळवी यांची ‘ट्रिक्स टू फिक्स’ ही इंग्रजी आणि गणित या विषयांची दोन दिवसीय कार्यशाळा शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये इंग्रजी विषयासाठी Device to revise चे ५ तासांचे २ सत्र आणि गणित विषयासाठी MathematRricks चे ५ तासाचे २ असे एकूण १० तासाचे ४ सत्र आयोजित करण्यात आले होते.

सौ. प्रतिभा पवार व श्री. सचिन बिडवे यांच्या स्वागतगीतानंतर श्री. दळवी यांच्या हस्ते सरस्वतीपुजन करण्यात आले. श्री. दळवी यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा परिचय सौ. रूपाली निंभोरकर यांनी करून दिला तर शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे आणि श्री. धनंजय निंभोरकर यांच्यासह शिक्षक-पालक संघाचे प्रतिनिधी आणि शाळेतील माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

दोन्ही सत्रामध्ये श्री. दळवी यांनी विदयार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारत व विदयार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग घेत गणित विषयातील अनेक संकल्पना त्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध नवनवीन व कल्पक शैक्षणिक मॉडेल विदयार्थ्यांना हाताळायला लावून सहज व ओघवत्या भाषेत समजावून सांगितले. यात रामानुजन मॅजिक स्क्वेअर अंतर्गत त्यांनी दिलेल्या विविध संख्यांची २२ वेळा विदयार्थ्यांनी बेरीज केली असता आलेले उत्तर हे १३९ होते. तसेच रामानुजन यांची जन्मतारीखेची बेरीज देखील या तक्त्यामुळे १३९ येते. त्यामुळे विदयार्थ्यांना गणित विषयाच्या आवडीस चालना मिळाली. कोणत्याही संख्यांचे वर्ग, वर्गमुळ, घन, घनमुळ हे वैदीक मॅथ्सच्या साहायाने सोप्या पध्दतीने शोधता येते हे त्यांनी दाखवून दिले. तसेच पास्कल त्रिकोणाच्या सहायाने विविध सुत्रांच्या पायाभूत संकल्पना त्यांनी रंजक पध्दतीने विदयार्थ्यांसमोर स्पष्ट केली. याशिवाय सम, विषम व मुळ संख्या तसेच विभाज्यतेच्या विविध कसोटया या त्यांच्या शैक्षणिक मॉडेलमधून विदयार्थ्यांना समजावून सांगितल्या. त्यामुळे गणित झाले किती सोपे असे भाव विदयार्थ्यांच्या चेह-यावर दिसत होते. त्रिकोणमितीचा तक्ता हा विदयार्थ्यांचा पाठच असावा लागतो, त्यासाठी विदयार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागते. त्याऐवजी श्री. दळवी यांनी त्रिकोणमितीचा तक्ता तयारच कसा करावा याचे तंत्र विदयार्थ्यांना शिकवले.

इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करतांना टेन्सेस-विदाउट टेन्शन या तक्त्याच्या माध्यमातून सर्व काळांतील रचनेची सुटसुटीत मांडणी त्यांनी करून दाखवली. इ. १० वीच्या परीक्षेच्या अनुषंगाने व्याकरणाच्या व लेखन कौशल्याच्या विविध मुद्दयांचे विश्लेषण पायाभूत संकल्पना त्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून करून विदयार्थ्यांची मने जिंकली. तसेच त्यांनी इ.१० वी च्या विदयार्थ्यांना वेळेचे नियोजन यावर अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले.

समारोप करतांना त्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांची कार्यशाळा घेतली. व प्रत्येक शिक्षकाने आपला विषय शिकवितांना त्यातील आशय अत्यंत सुलभ करण्यासाठी नवनवीन कल्पक सृजनशील असे स्वतःचे शैक्षणिक साधनं निर्माण करावीत. विदयार्थ्यांचा त्यात सहभाग घ्यावा त्यामुळे विदयार्थी घोकंपट्टी न करता स्वयंप्रेरणेतून शिक्षण घेवू शकतात असे मोलाचे मार्गदर्शन केले.

शिक्षक-पालक संघाचे सदस्य श्री. सुनिल वाढवणे आणि श्री. अरूण सोनवणे यांनी शाळेने राबविलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात दिग्गज असणा-या वक्त्यांच्या माध्यमातून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी शाळा करीत असलेले आगळे वेगळे उपक्रमही स्तुत्य असल्याचे नमूद केले.

श्री. दळवी यांच्या दोन दिवसीय निवास, भोजन इ. सर्व सुविधा संस्था व शाळेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. कार्यशाळे व्यतिरिक्त त्यांच्या हॉटेलच्या निवासस्थानी विविध शिक्षकांनी जावून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक त्या गोष्टींबाबत त्यांच्याशी संवाद साधला.

ब्राम्ही गायकवाड, शुभम् सरस्वते, प्रथमेश मुळे, मंजिरी कटारे यांनी दळवी सरांचे आभार मानले आणि आपले मनोगत व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

.