loader image

गुलाबी थंडीतही ‘शेकोटी’ची ऊब अनुभवली !

Jan 16, 2024


नाशिकच्या गुलाबी थंडीत शेकोटी लोककला साहित्य संमेलनात लोक संस्कृतीचा हलकासा शेक दोन दिवस अनुभवला. लोककला आणि लोक यांचेशी आमचं एक नातं राहिलं आहे. अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे आमचे कुटुंब एक घटक राहिले आहे. नाशिकला परिषदेचे पहिले अधिवेशन झाले होते, त्याची काहीशी झलक या शेकोटी संमेलनात अनुभवयास मिळाली. यासाठी गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिकला धन्यवाद दिले पाहिजे. विशेषतः सुरेश पवार व त्यांच्या टीमचे खास कौतुकही केले पाहिजे. शहरं जरी आज आपल्याला विस्तारलेले दिसत असले तरी त्यात भर ग्रामीण भागातील लोकांनीच टाकली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. आजही या सर्वांना आपली संस्कृती व कला याबद्दल अभिमान आहे. नाशिक शहरात शेकोटी संमेलनास जो मोठा प्रतिसाद लाभला त्यावरून अधोरेखीत होते. मध्यंतरी नाशिकच्याच दत्ता पाटील व सचिन शिंदे यांच्या टीमने जो ‘कलगीतुरा’ सादर केला त्याचाही प्रमुख आधार लोककला हाच होता, त्यालाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद शेकोटी संमेलनास मिळाला.
सुरवातच वाघ्या मुरळीच्या ताल वाद्याने झाली. संपूर्ण भावबंधन कार्यालयाचे वातावरणात शेकोटीची ऊब निर्माण झाली. उत्तरोत्तर हे संमेलन रंगत गेले. या शेकोटी संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रपती पदकाने सन्मानित तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे आणि आंतरराष्ट्रीयख्यातीच्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या खास संयुक्त अदाकारीने संपूर्ण भावबंधन कार्यालयाचा मंच तसेच कलारसिक प्रेक्षक मोहरून गेले. त्यामुळे शेकोटी संमेलनास ‘चार चांद’ लागले. खरं तर हा क्लायमॅक्स होता. प्रथमच त्या दोघींनी त्यांच्या आयुष्यात एकत्रीत कोणताही साजशृंगार न करता हा परफॉर्मन्स केला होता. त्यामुळे शेकोटी संमेलनाचे वातावरण अधिक उबदार झाले होते.
नाशिकरच नव्हेतर जिल्ह्यातील कला रसिकांना लोककलेची दोन दिवस ही मोठी मेजवानी होती. या लोककलेला पुनरुज्जीवन मिळण्यासाठी शेकोटीचा मोठा आधार मिळाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
लोककलाकारांची हलाखीची परिस्थिती याही संमेलनात अनुभवयास मिळाली. सादरीकरण करणाऱ्या कलावंतांच्या अंगावर धड कपडेही नव्हते, आहे त्या परिस्थितीत त्यांच्या सादरीकरणाचा जोश कायम होता. या कलेला लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही लाभला पाहिजे, असे प्रकर्षाने जाणवले, वाटले. त्यांच्या सदरीकरणास दाद मोठी मिळाली. काहींनी थोडीफार आर्थिक मदत केली; परंतु हा काडीचाही तसेच कायमस्वरूपी आधार होऊ शकत नाही हे विस्तवा इतके वास्तव होय. त्यांच्या आयुष्यात चटकेच अधिक आहे. त्यांना खऱ्याअर्थाने शेकोटीची ऊब मिळायला हवी. त्यासाठी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे योगदान मोलाचेच होय.


या शेकोटी संमेलनाच्या निमित्ताने गिरणा गौरवचे माणूसमित्र सुरेश पवार व गिरीजा महिला मंचच्या डॉ. अश्विनीताई बोरस्ते व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद ! या संमेलनात अनेक मित्रांची भेटही झाली हाही आनंद मोठाच होय. शेवटी या संमेलनात माझ्यासह अनेकांच्या साहित्यकृतीचा, कलेचा सन्मान केला गेला यासाठीही मनःपूर्वक आभार !
– भास्कर कदम नांदगावकर


अजून बातम्या वाचा..

.