प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठेचा ‘प्रधानमंत्री बॅनर’ सलग तिसऱ्यांदा पटकावल्याबद्दल या छात्रसैनिकांचा सत्कार व या छात्रसैनिकांना ‘प्रधानमंत्री बॅनर’ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.
महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रतिष्ठेचा ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान सलग तिसऱ्यांदा पटकविला आहे. त्यांनी मिळवलेले यश गौरवास्पद आणि त्यांच्या मेहनतीचे, सांघिक कामगिरीचे आहे.
हे सरकार जनतेचे, सर्वसामान्यांचे आहे. अशा कामगिरीमुळे विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. तुमच्या यशामुळे राज्याचा गौरव वाढला असून भविष्यातही हा बहुमान कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मेहनत करावी. महाराष्ट्र शासन सर्व सहकार्यासाठी संचालनालयाच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र छात्र सेना संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग, ब्रिगेडिअर विक्रांत कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी, छात्रसैनिक उपस्थित होते.