मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म आरतीदरम्यान आग लागली. या आगीच्या घटनेत पुजाऱ्यासह १३ जण जखमी झाले आहेत. आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेदरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह म्हणाले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
या घटनेत लोक किरकोळ भाजले. कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.