loader image

माणसातील जगण्याच्या क्षमता वाढवणे हा साहित्याचा हेतू- प्राचार्य गमे

Aug 30, 2024


मनमाड (वार्ताहर)- साहित्य आणि जीवन यांचा अनुबंध असून माणसातील जगण्याच्या क्षमता वाढवणे हा साहित्याचा हेतू असतो असे प्रतिपादन येवला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वांडमय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भाषणात ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वांडमयीन मूल्यांबरोबरच जीवन मूल्यें रुजवण्याचे महत्त्वाचे कार्य वांडमय मंडळामार्फत होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रतिभेला जागृत करून त्याला अनुभवाची जोड दिल्यास दर्जेदार वाङ्ममय निर्माण करण्याची क्षमता येते. आणि प्रतिभा जागृत करण्यासाठी जगभरातील अनेक उत्कृष्ट साहित्य कृतींचे वाचन, श्रवण व चिंतन केले पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी साहित्य कलागुणांचा विकास करत असताना सामाजिक, आणि सांस्कृतिक नीती मूल्यांची जोपासना करून आदर्श समाज निर्मितीसाठी योगदान दिले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ. अनिल आहेर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. विष्णू राठोड यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्राध्यापक सोमनाथ पावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी स्वरांजली घुसळे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा .व्ही.डी. सोनवणे, डॉ. वानखेडे, प्रा. काखंडकी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आर ए जाधव, डॉ. परदेशी, प्रा. शरद वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

.