loader image

मनमाड येथे १४ जानेवारीला चंद्रकांत पागे यांचा ऑडियो व्हिज्युअल कार्यक्रम

Jan 12, 2025


मनमाड – येथील कवी रबिंद्रनाथ टागोर अॅण्ड ज्यु. कॉलेज, मनमाड येथे अष्ठपैलू प्रेरणादायी वक्ते श्री. चंद्रकांत पागे यांचे परीक्षेची भीती ताण-तणाव दूर करून प्रचंड मनोबल वाढवणारा प्रेरणादायी अॉडिओ-व्हिज्युअल कार्यक्रम ‘येवू दे परीक्षा, आम्ही तयार आहोत’ मंगळवार, दि.१४ जानेवारी २०२५ रोजी स.०९.०० शाळेत आयोजित केलेला आहे. फेब्रु-मार्च २०२५ मध्ये इ.१२, १० वी च्या होणा-या मंडळाच्या परीक्षा लक्षात घेवून खास केआरटी च्या विद्यार्थी व पालकांसाठी ठेवलेला आहे.

बोर्डाच्या परीक्षेच्या ताणतणावामुळे होणारा मानसिक गोंधळ कसा कमी करावा? परीक्षेनुरूप कोणत्या अभ्यासतंत्राचा अवलंब करावा? कोणत्या पध्दतीचा आहार घ्यावा? हलके व्यायाम कोणते करावे? स्वयंसुचनातंत्राचा वापर कसा करावा? सकारात्मकता विकसित करून नैराश्यावर मात कशी करावी? इ. मुद्दयांच्या आधारे विद्यार्थ्यांना श्री. पागे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे तर पालकांसाठी मुले परीक्षेला सामोरे जात असतांना पालकांनी नेमके काय करावे व काय करू नये? घरातील वातावरण आनंदी व उत्साही कसे ठेवावे? मुलांना प्रोत्साहन कसे दयावे. मुलांच्या आरोग्यविषयी, आहाराविषयी आणि विश्रांतीविषयी कोणती खबरदारी घ्यावी? वाढत्या मोबाईलच्या वापराबद्दल खबरदारी व उपाययोजना या अनुषंगाने आॅडिओ-व्हिज्युअल माध्यमातून चर्चासत्र होणार आहे.

श्री. चंद्रकात पागे हे मुख्य समुपदेशक म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत. मागील ११ वर्षापासून प्रख्यात फिंगरप्रिंट विश्लेषक म्हणून त्यांनी नावलौकिक कमावलेला आहे. आजपर्यंत १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी नवसंजिवनी दिलेली आहे. ते उद्योगक्षेत्रातील उत्तम प्रशिक्षक, सिध्दहस्त लेखक, सृजनशिल कलानिर्देशक, कवी, ग्राफिक डिझायनर, उत्तम वादक व गायक आहेत. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या अनेक पुस्तकांनी विद्यार्थी-शिक्षक-पालक व समाजातील विविध घटकांना जगण्याची व यश मिळविण्याची नवीन दिशा मिळालेली आहे.

अशा या अष्ठपैलू वक्त्याचे व्याख्यान मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रेरणादायी विचारांचं तिळगूळ वाटप करण्याचा संस्था व शाळेचा अनोखा उपक्रम आहे. तरी या उपक्रमास शाळेतील इ.१० वी व १२ वीचे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच शिक्षक-पालक संघ, माता पालक संघ, विशाखा समिती, सखी सावित्री समिती, राजू मिना मंच या विविध समित्यांच्या पदाधिका-यांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी केलेले आहे.


अजून बातम्या वाचा..

.