नांदगाव: मारुती जगधने
येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या
‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुणे येथील प्रकाशन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या सन्मती बाल निकेतन संस्थेच्या आवारात संपन्न झाले.
यावेळी प्रसिद्ध कवयित्री,सन्मतीच्या संचालिका ममता सिंधुताई सपकाळ यांचे हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. संदीप सांगळे, लेखक संदीप राक्षे, पवना सहकारी बॅंकेचे संचालक दादू डोळस, नंदकुमार पवार, कवयित्री प्रतिभा खैरनार उपस्थित होते.
यावेळी बोलताना ममता सिंधुताई सपकाळ यांनी स्त्री मनाच्या तरल भावनांचा आविष्कार या कवितांमधून आला आहे. स्त्रीचे जगणं, दुःख व दुःखाचे कंगोरे नेमकेपणाने कवयित्री हीने शब्दात मांडले आहे.
स्त्रीवादी साहित्य म्हणून हा कवितासंग्रह सर्वांना नक्कीच भावणारा असा असुन वाचकांच्या पसंतीस उतरेल. यावेळी प्रा. सांगळे यांनी कवयित्री यांच्या प्रतिभेचे कौतुक करून प्रत्येक साहित्यकृती उत्तम घडत असुन प्रकाशकांनी साहित्य विश्वाला चांगला कविता संग्रह दिल्याचे नमुद केले. यावेळी लेखक संदीप राक्षे यांनी काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या.
प्रतिभा खैरनार यांच्या यापुर्वी दोन कवितासंग्रह व एक कथासंग्रह प्रकाशित असुन या तीनही पुस्तकांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी नंदकुमार पवार यांनी सुत्रसंचलन केले तर कवयित्री प्रतिभा खैरनार यांनी आभार मानले.
यावेळी किरण पवार, अविनाश पवार, योगेश पवार, नैनिता पवार,मनीषा पवार आदींसह कुटुंबिय व सन्मती बाल निकेतन मधील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळी
पुणे : येथील सन्मती बाल निकेतन संस्थेत नांदगाव येथील कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या
प्राचीन सरीतून’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रसिद्ध कवयित्री ममता सिंधुताई सपकाळ, कवयित्री प्रतिभा खैरनार,प्रा. संदीप सांगळे, संदीप राक्षे, दादू डोळस, नंदकुमार पवार.