चांदवड |
आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव विद्यालयातील कलाशिक्षक देव हिरे यांनी साकारलेली विठ्ठल प्रतिमा सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरतेय. मात्र ह्या कलाकृतीत विशेष ठरतोय तिचा कॅनव्हास — तो आहे जांभूळ!
होय, काळसर जांभळाच्या फळावर अक्रेलिक रंगात विठ्ठलाची सूंदर प्रतिमा रंगवून त्यांनी निसर्गात आणि भक्तीतल्या रंगांना एकत्र जुळवले आहे. भक्तीचा अशा प्रकारे अनोखा आविष्कार करणाऱ्या हिरे सरांनी, काळ्या रंगाची व्याख्या नव्याने केली आहे.
“काळा रंग म्हटला की समाजात हेटाळणी होते, पण तोच रंग विठ्ठलाच्या रूपात प्रत्येक भक्ताच्या हृदयात साजरा होतो. म्हणूनच मी विठ्ठलासाठी ‘काळ्या रंगाचं फळ – जांभूळ’ निवडलं,” असं देव हिरे सांगतात.
ते पुढे म्हणतात, “वारी हा काळ केवळ भक्तीचा नसून बीजारोपणाचाही आहे. जांभूळ हे आरोग्यदायी फळ असून, त्याची झाडं आता दुर्मीळ होत चालली आहेत. विठ्ठलाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करतानाच, आपण या निमित्ताने एक तरी जांभळाचं झाड लावावं – हाच संदेश या चित्रामधून द्यायचा आहे.”
या आगळ्या-वेगळ्या कल्पनेतून भक्ती, पर्यावरण, आणि कला यांचं विलक्षण त्रिसूत्री साधणारी ही कलाकृती पाहणाऱ्याच्या डोळ्यात devotional spark आणते.
आषाढीच्या पावसात न्हालेला सावळा विठ्ठल आणि निसर्गाच्या कुशीत बहरलेली जांभूळ – याचं हे एक सुंदर प्रतीक!
🌿 “विठ्ठलाच्या चरणी फळांची ही एक निसर्गमय अर्पण भावना…!” 🌿