loader image

फलक रेखाटन ‘बैलपोळा’. दि.२२ ऑगस्ट २०२५

Aug 22, 2025


आपल्या भारतीय कृषिप्रधान संस्कृतीतील हजारो वर्षांपासून शेतात शेतकऱ्यांसाठी राब-राब राबणाऱ्या बैलाचा सण म्हणजे बैलपोळा. जगाचा पोशिंदा शेतकऱ्याचा खरा सारथी,मित्र,सखा,सोबती, इमानदार सहकारी म्हणजे त्याचा सर्जा-राजा. हीच शेतकऱ्यांची खरी दौलत आहे.
आजच्या या सणाच्या दिवशी सर्व शेतकरी बांधव आपल्या लाडक्या बैलांना अंघोळ घालतात, झुल,घंटी,घुंगरू,फुलमाळा, फुगे,रंगांनी नटवून सजवून पुरणपोळीचा गोड नैवद्य खाऊ घालून त्याच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतात आणि पुन्हा पुढील वर्षभर आपल्या बैलाच्या साथीने कष्ट करून शेतात सोनं उगवण्याची हिम्मत व प्रेरणा घेऊन अभिमानानं वाटचाल करतात. वर्षानुवर्षे मुकाट्याने मातीत अविरत कष्ट करणाऱ्या या बैलाचे पांग कसं फेडावं ? ज्याच्या कष्टाने साऱ्या जगाचे पोट भरते त्याचे उपकार कधीही फेडता येणार नाहीत.
अस्मानी व सुलतानी संकटाला सामोरे जाणाऱ्या जगाचा पोशिंदा शेतकऱ्याच्या या मुक्या इमानदार सर्जा-राजाच्या अविरत परिश्रमाला , विश्वाच्या या पोषणकर्त्या बळीराजाच्या कष्टाला व घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या पिकाला योग्य दाम मिळो हीच या दिवशी एक आशा,,,!!
“इडा पिडा टळू दे , बळीराजाचे राज्य येऊ दे…!”
– फलक रेखाटन- देव हिरे (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

.