
गणेशोत्सवाच्या उत्साहात आता ज्येष्ठा गौरीच्या आगमनाने घराघरांत मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठा गौरीचे स्वागत करण्यात आले. गौरीच्या आगमनानिमित्त महिला वर्गात विशेष उत्साह दिसून आला.
घरांची स्वच्छता, सजावट यामुळे घरांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. गणेशोत्सवात ज्येष्ठा गौरीला विशेष महत्त्व आहे. अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार गौरीचे आगमन केले जाते. काही ठिकाणी गौरीच्या मुखवट्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली, तर काही घरांमध्ये धान्य, फुलांची आकर्षक सजावट करून गौरीचे स्वागत करण्यात आले.
गौरीच्या आगमनापूर्वी महिलांनी घरांची स्वच्छता करून आकर्षक रांगोळ्या काढल्या. दारासमोर तोरणे, फुलांची सजावट तसेच रोषणाई करण्यात आली होती. गौरीच्या पूजेसाठी विविध प्रकारची फळे, भाज्या, धान्य, मिठाई आणि नैवेद्याचे पदार्थ तयार करण्यात आले. काही कुटुंबांमध्ये पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी, भाजी, भाकरी, खीर यांसह विविध पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला.











