Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक

Oct 29, 2026

आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे घवघवीत यश; तिन्ही खेळाडूंची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड

विसनगर, मेहसाणा (गुजरात) येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनमाडच्या आकांक्षा किशोर व्यवहारे हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले, तर मेघा संतोष आहेर हिने कांस्यपदकाची कमाई केली. श्रावणी विजय पुरंदरे हिने चौथा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. या तिन्ही खेळाडूंची भुवनेश्वर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.

आकांक्षा व्यवहारे हिने ४९ किलो वजनी गटात चुरशीच्या लढतीत स्नॅचमध्ये ६९ किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये ८६ किलो असे एकूण १५५ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

५३ किलो वजनी गटात मेघा संतोष आहेर हिने स्नॅचमध्ये ६८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ८९ किलो असे एकूण १५७ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. तर ५७ किलो वजनी गटात श्रावणी विजय पुरंदरे हिने स्नॅचमध्ये ६४ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ८० किलो असे एकूण १४४ किलो वजन उचलत चौथा क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील विविध विद्यापीठांच्या सुमारे २०० महिला वेटलिफ्टर्स सहभागी झाल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तीन सुवर्णपदके व एक कांस्यपदक मिळवत सांघिक विजेतेपद पटकावले.

या यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे मनमाडच्या क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशाबद्दल जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष पोपटशेठ बेदमुथा, डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. डॉ. दत्ता शिंपी, नगराध्यक्ष योगेश पाटील, वागदर्डी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन, मुख्याध्यापक संतोष भराडे, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाडचे प्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर, क्रीडा संचालक डॉ. सुहास वराडे तसेच महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असून आगामी अखिल भारतीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]