एखद्या वादातुन शत्रू एक दुसऱ्याची सुपारी देऊन त्याला संपवण्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील, परंतु नागपूर शहरात पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच त्याची सुपारी देऊन खात्मा केल्याची घटना घडली आहे. खाप येथील रहिवासी मयत प्रदीप जनार्दन बागडे (वय ४७ रा. वंजारीनगर, अजनी) याच्या हत्याकांडाचा पर्दाफाश करून पोलिसांनी मारेकऱ्याला अटक करून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यानंतर याचा संपूर्ण खुलासा झाला व खापा पोलिसांनी बागडेंच्या पत्नीलाही अटक केली.
सीमा प्रदीप बागडे (वय ४०), पवन विठ्ठलराव चौधरी (वय २१, रा. रामेश्वरी, मूळ रा. थडीपवनी), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पवन कार वॉशिंगचे काम करतो. बागडे यांचे बिर्याणी सेंटर व चायनीजचा ठेला असून ते प्रॉपर्टी डिलिंगचेही काम करायचे. सीमा व प्रदीप या दोघांत सतत वाद व्हायचे. प्रदीप नेहमी मारहाण करायचे, असे सीमाचे म्हणणे आहे. सीमाने पवनला तीन लाख रुपयांत प्रदीप यांच्या हत्येची सुपारी दिली. सुरुवातीला ५० हजार रुपये दिले. यासह पवनला प्लॉट देण्याचेही आश्वासन दिले. पवनने सतरावर्षीय अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने प्रदीप यांच्या हत्येचा कट आखला. १६ सप्टेंबरला थडीपवनी परिसरात प्लॉट बघायला जायचे असल्याचे सांगून पवन व त्याचा साथीदार प्रदीप यांना कारने (एमएच-४९-यू-७२०७) घेऊन थडीपवनी परिसरात गेले. तेथे अल्पवयीन साथीदाराने लोखंडी रॉडने प्रदीप यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर पवनने चाकूने सपासप शरीरावर वार केले. प्रदीप यांचा मृत्यू झाला. दोघांनी त्यांचा मृतदेह पोत्यात टाकला. त्यानंतर दोघांनी मृतदेह खापा परिसरात फेकला. मंगळवारी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. खापा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक सत्यवान कदम, हेडकॉन्स्टेबल शैलेश ठवरे, अश्विन बडगे, आशिष तितरमारे, राजेश मोते, प्रफुल्ल वाघमारे, राजेश धोपटे, प्रदीप भदाडे हे मंगळवारी रात्री गस्त घालत होते. ढगेच्या बंगल्याजवळ पवन व त्याचा साथीदार पोलिसांना संशयास्पद स्थितीत दिसले. पोलिसांना बघताच दोघे पळायला लागले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. चौकशी केली असता प्रदीप बागडे यांची हत्या केल्याचे दोघांनी सांगितले. पोलिसांनी दोघांना खापा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दोघांची कसून चौकशी केली. बागडे यांची पत्नी सीमाने तीन लाख रुपयांमध्ये हत्येची सुपारी दिल्याचे पवनने पोलिसांना सांगितले. त्यानंतर स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी सीमालाही अटक केली.













