loader image

कोरोनानंतर कशी घ्याल आपल्या बालकांची काळजी ?

Sep 24, 2021


कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून मानवी जीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वात मोठा परिणाम मानवी आरोग्यावर झालेला दिसून येतो त्यातच इतके दिवस घरातच राहिल्यामुळे लहान मुलांमध्ये लट्ठपणा, अशक्तपणा असे विविध दुष्परिणाम दिसून येत आहेत. आजपासूनच लहान मुलांच्या आरोग्यावर झालेला हा परिणाम पुढे मोठ्या आजाराला आमंत्रण देऊ शकतो, त्यामुळे आजपासूनच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी पालकांना पुढील काही गोष्टीचा त्यांच्या जीवनात समावेश खूप महत्वाचा आहे.

समतोल आहार म्हणजे नक्की काय?

आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी समतोल किंवा संतुलित आहाराचे आयुष्यात खूप महत्त्व आहे. पिष्टमय पदार्थ/ कबरेदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे, फाइबर आणि पाणी (द्रव पदार्थ) हे सात अन्नघटक शरीरासाठी गरजेचे असतात.

स्निग्ध पदार्थ हे शरीराला ऊर्जा प्राप्त करून देतात, प्रथिने ही शरीरबांधणीचे कार्य करतात, जीवनसत्त्व आणि खनिजे हे संरक्षण आणि नियमन हे कार्य पार पाडून शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. फाइबर हे पचनसंस्थेचे काम सुरळीत पार पाडतात आणि द्रवपदार्थ हे शरीराच्या तापमानाचे नियमन करतात. याशिवाय हे सर्व अन्नघटक इतर अनेक शारीरिक कार्यासाठी उपयोगी असतात.

या अन्नघटकांची गरज वय, लिंग, शारीरिक हालचाल, असलेले आजार आणि प्रकृतीनुसार बदलते. प्रत्येक व्यक्तीच्या गरजेचा विचार करून हे सर्व अन्नघटक पुरवला जाणारा आहार म्हणजेच संतुलित आहार. हा व्यक्तीसापेक्ष असतो. हे अन्नघटक योग्य त्या प्रमाणात शरीराला पुरवले गेले तरच शरीर सशक्त राहू शकते.

आरोग्यदायी सवयी..

मुलांना घरचे जेवण खाण्याची सवय लावावी. त्यात पौष्टिक असे सर्व अन्नघटक असतात. न्याहारी ही संपूर्ण दिवसाला मिळणाऱ्या ऊर्जेपैकी एक तृतीयांश ऊर्जा पुरवते म्हणून न्याहारी कधीच चुकवू नये. त्यात कबरेदके, प्रथिने यांचा समावेश असावा. पोहे, उपमा, शिरा, इडली-सांबार, डोसा, उतप्पा, विविध मिश्र धान्यांचा ब्रेड सँडविच, मिश्र पीठ व भाज्याचे पराठे असे पदार्थ देता येतील. याचबरोबर प्रथिनाचे स्रोत जसे दूध, चीज, अंडी यांचा समावेश असावा. मुलांना दिवसांतून दोन ते तीन वेळा कपभर दूध द्यावे. ज्या मुलांना दूध आवडत नाही त्यांना फुट्र सलाड, दही, चीज, कस्टर्ड, पुडिंग असे दुग्धजन्य पदार्थ द्यावेत.

जीवनसत्त्वे व खनिजासाठी भरपूर फळेही द्यावीत. दुपारचे व रात्रीचे जेवण यात पोळी, विविध भाज्या, भात, आमटी, विविध कोशिंबीर असा चौरस आहार असावा.

सध्याच्या जीवनशैलीमुळे होणारे आहारातील बदल

बदलत्या जीवनशैलीत पालकांना असलेल्या वेळेच्या अभावामुळे, मानसिक ताण, चमकदार आकर्षित करणाऱ्या जाहिराती, सहज उपलब्ध असलेल्या पदार्थ किंवा घरबसल्या ऑर्डर करण्याच्या सुविधेमुळे..कारण कुठलेही असो तरीही आपण फास्ट फूड आणि जंक फूड तसेच पटकन मिळणाऱ्या वडापाव, सामोसा, कचोरी यांच्या आहारी जात आहोत. पिज्जा, बर्गर, चिप्स, वेफर, डोनट, कूकिझ, फँ्रन्की, नुडल्स, शीत पेये यांमुळे खूप प्रमाणात स्निग्ध, शर्करायुक्त असलेले पदार्थ मुले व मोठेही खातात. यात पौष्टिक अन्नघटक नसतात. पण चविष्ट असल्यामुळे घरचे सकस पौष्टिक जेवण नकोसे वाटू लागले आहे. परिणाम भयंकर आजारांना तोंड देणे.

कधीतरी हे पदार्थ खाण्याचा मोह हा होतोच. अशा वेळी पालकांनी हे पदार्थ घरी केले तर उत्तम. मैद्याच्या ब्रेडऐवजी गव्हाचा (होल व्हीट) किंवा मिश्र धान्याचा ब्रेड वापरणे, चीझ बटर, तेल यांचे प्रमाण कमी करणे, ऑलिव्ह ऑइल वापरणे, वनस्पती तुपाचा वापर न करणे, कमी चरबीयुक्त चीज वापरणे, चीजच्या मोठय़ा तुकडय़ाऐवजी चीज किसून थोडे वापरणे, चीजऐवजी गाईच्या दुधाचे पनीर वापरणे, चरबी काढून मटणाचा उपयोग करणे असे काही उपाय वापरून हे पदार्थ थोडय़ा प्रमाणात पौष्टिक बनवू शकतो.


अजून बातम्या वाचा..

.