कोणताही व्यवसाय सुरु करायचा म्हणजे पहिली पायरी असते ती म्हणजे भांडवल ! आजच्या युगात भांडवल उपलब्ध करण्याचे मध्यम म्हणजे कर्ज. कोणत्याही वित्त संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी गेल्यावर सर्वात आधी पाहिला जातो तो आपला सिविल स्कोर. सिविल स्कोर चांगला तर कर्ज अगदी सहज उपलब्ध होण्यास बरीचशी मदत होते. काय असतो हा सिविल स्कोर ? तो कसा मेन्टेन करायचा ? या बद्दल थोडेसे….
कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना बँका नेहमी एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर तपासतात. यात सदर अर्जदाराचा आर्थिक रेकॉर्ड उपलब्ध असतो. अर्जदार डिफॉल्ट झाली आहे की नाही हे तपासू शकते किंवा त्याने कोणताही हप्ता भरला नाही, याची देखील माहिती उपलब्ध होते.
आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट स्कोर निश्चित केला जातो. साधारण 300 ते 900 मध्ये तुमचा क्रेडिट स्कोर मोजला जातो. अर्जदाराचा क्रेडिट स्कोर किमान 750 असणे आवश्यक आहे. स्कोर जितका जास्त तितके जास्त कर्ज उपलब्ध होते. क्रेडिट स्कोर मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
हप्ते वेळेवर फेडा : कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यास तुमच्या क्रेडिट स्कोरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही किती वेळेत हप्ते भरता याची संपूर्ण माहिती ठेवली जाते. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यात दिरंगाई केली तर भविष्यात ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते.
क्रेडिट कार्डासाठी विनाकारण अर्ज करु नका : तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करत असाल तर ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत काहीतरी त्रुटी आहेत, असा समज होऊ शकतो. तुम्ही कोणतेही कर्ज घेता तेव्हा हा तपशील पाहिला जातो. तुम्ही एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्डासाठी अप्लाय केले आणि अगोदरच्या क्रेडिट कार्डाचे हप्ते थकवले असतील तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो.
मिनिमम ड्यूजचा पर्याय शक्यतो टाळाच : तुम्ही क्रेडिट कार्डावर एखादी महागडी गोष्ट खरेदी केली तर त्याचे बिल तात्काळ भरा. तुम्ही पूर्ण हप्ता न भरता मिनिमम ड्यूज भरत राहिलात तर कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. एका महिन्याचे व्याज दुसऱ्या महिन्यात ट्रान्सफर होत राहिले तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो.
वेळेआधी कर्ज फेडण्याची घाई करु नका : तुम्ही एखादे कर्ज वेळेआधी फेडले तर तुम्ही निर्धास्त होता. मात्र, याचा विपरित परिणाम क्रेडिट स्कोरवर होतो. तुम्ही सिक्योर्ड लोन घेतले असेल तर लोन फोरक्लोझरमुळे क्रेडिट हिस्ट्री कमी होते. तसेच लोन फोरक्लोझरसाठी बँका तुमच्याकडून शुल्क आकारतात.
आपण आपल्या सिविल स्कोर योग्य प्रकारे नियोजित केला तर भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात त्याचे लाभ घेऊ शकता.













