शिवसेना नेते खा.संजय राऊत तीन दिवस नाशिक जिल्हा दौर्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान नाशिक प्रभाग समितीच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी शनिवारी शिवसेनेच्या मंचावर हजेरी लावत भाजपला मोठा धक्का दिला आहे. हि तर फक्त सुरुवात आहे अजूनही भाजपचे जवळपास १७ ते १८ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली असून माजी उपमहापौर प्रथमेश गितेंपाठोपाठ आता नाशिक प्रभाग समितीच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी शनिवारी शिवसेनेच्या मंचावर हजेरी लावली आहे. त्यामुळे भाजपमध्ये आगामी काळात मोठी पडझड पाहायला मिळते कि काय असे चित्र निर्माण झाले आहे.








