चांदवड तालुका व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल चांगल्या दरात विक्री करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन कार्यालयाचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.भारतीताई पवार यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर हे राहणार आहेत.
नवीन कार्यालय अत्यंत हायटेक पद्धतीचे असुन प्रशस्त सभापती, उपसभापती व सचिव दालन, प्रशस्त मिटिंग हाँल, बाजार समितीच्या बाजारभावा संदर्भात अपडेट व्यवस्था असून गुरुवारपासून सदर कार्यालयात बाजार समितीचे कामकाज सुरू होत आहे. कार्यक्रमास चांदवड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितिन आहेर, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, समस्त संचालक मंडल तसेच अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व हमाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.











