कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद होती. आता राज्य शासनाने काही निर्बंध घालून शाळा व महाविद्यालये सुरु केली आहे. राज्यात सध्या आठवी ते दहावीचे वर्ग भरत असून सहामाही परिक्षा सुरु आहेत. शाळा पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातल्या एका शाळेत मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शाळेत दहावीच्या दोन गटात खेळण्यावरुन जबर हाणामारी झाली. यात एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शाळेजवळील प्रगती हॉस्पीटल इथल्या पाईलाईन ब्रिजवर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हा वाद इतका टोकाला गेला की तीन विद्यार्थ्यांनी एका पंधरा वर्षीय मुलाच्या छातीत सूरा खुपसला. तुषार साबळे असं या विद्यार्थ्याचं नाव असून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तुषारचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीन आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.













