कोरोना विषाणूच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना घरी राहून देखील शिक्षण घेता आले. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. याच बाबींचा विचार करून इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेच्या वतीने मोफत टॅबचे वाटप जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले.
महाज्योतीच्या माध्यमातून आधुनिक प्रकारचे शिक्षण देण्यासाठी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी महाज्योती संस्थेचे संचालक प्रा. दिवाकर गमे, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे यांच्यासह महाज्योतीच्या वतीने ऑनलाईन प्रशिक्षण घेणारे जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाज्योतीमार्फत इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील 122 विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तनुजा भालेराव, नंदिनी वाकारे, गायत्री पुंड, दानीज शेख, सूरज परदेशी, सूरज परदेशी व रोहिणी मिस्त्री या विद्यार्थ्यांना पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते मोफत टॅबचे वाटप करण्यात आले.












