राज्यातील 106 नगर पंचायतीच्या आणि दोन जिल्हा परिषदांच्या स्थगित केलेल्या जागांवर 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांची एकत्रित मतमोजणी 19 जानेवारी रोजी होईल, असा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाला स्थिगिती दिली होती. तसेच सध्या जाहीर झालेल्या 106 नगर पंचायतींच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोर्टाचे आदेश आल्याने ही प्रक्रियाच चुकीची असल्याचे मत अनेक राजकीय पक्षांनी मांडत निवडणूका पुढे ढकलण्याची विनंतीही निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या निवडणूका पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आत्ताच्या निर्णयानुसार, नगरपंचायतींच्या निवडणूका आता पुढील वर्षात होतील. यापूर्वी 21 डिसेंबर रोजी मतदान होऊन 22 डिसेंबर रोजी मतमोजणीच्या तारख्या जाहीर झाल्या होत्या. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून या जाहीर झालेल्या सर्वच निवडणूका पुढील वर्षात होतील. राज्यातील 32 जिल्ह्यांतील 106 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठीचे मतदान 18 जानेवारी 2022 रोजी होईल व 19 जानेवारी रोजी विद्यमान निवडणुकांचा निकाल लागेल.












