loader image

भाजपचे मुरजी पटेल घेणार माघार ; अंधेरी पोटनिवडणुकीत लटकेंचा मार्गे सुकर

Oct 17, 2022


अंधेरी पोटनिवडणुकीत अखेर भाजपने माघार घेतली आहे. या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात मुकाबला होणार होता.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील असं त्यांनी सांगितलं. मुरजी पटेल अपक्ष म्हणूनही लढणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

“निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, असं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. आता बिनविरोध झाल्यानं सगळ्यांचे आभार मानते. गेले काही दिवस माझ्यासोबत प्रचारासाठी धावपळ करत होते, त्या सगळ्यांचे आभार. माझे पती रमेश लटके यांचे सर्वपक्षीयांशी सौहार्दपूर्ण संबंध होते. अंधेरीचा विकास हेच माझं ध्येय असेल”, असं ऋतुजा लटके यांनी सांगितलं.

“हे भाजपला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या निर्णयाचं स्वागत केलं.

“या निवडणुकीसंदर्भात जो निर्णय होईल त्याचा परिणाम मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर होणार होता. या निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रकार घडला तो सामान्य माणसाला आवडलेला नाही. विजय मिळणार याची खात्री असती तर माघार घेतली नसती”, असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

“महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. दिवंगत व्यक्ती जाते, घरातलं कुणी उभं राहतं तेव्हा आम्ही उमेदवारी देत नाही. भाजपने आडमुठेपणा केला. लटके मॅडमचा राजीनामा अडकवण्यात आला. त्यावेळी ज्या पद्धतीने त्रास देण्यात आला ते आम्ही पाहिलं. भाजपने मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेतला आहे. मुरजी पटेल यांनी महानगरपालिकेत खोटं जात प्रमाणपत्र दिल्याने वाद निर्माण झाला होता. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हे सगळं आधी करता आलं असतं. घमासान झालं नसतं. लटके मॅडमना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जो मानसिक त्रास झाला त्याचं काय करणार”? असं शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली होती. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केली होती.

एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर ही निवडणूक म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील थेट लढत मानली जात होती. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या निवडणुकीचं महत्त्व वाढलं आहे.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.