मनमाड : (योगेश म्हस्के) हिंदु समाजातील सर्वात मोठा असणारा सण म्हणजे दिवाळी , गरीब असो वा श्रीमंत जो-तो आपल्या परीने दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.
दर वर्षी दिवाळी सणामध्ये प्रत्येक नागरिक हे आपल्या परिवारासह बाजार पेठेमध्ये खरेदी करत असतात.यासाठी बाजारामध्ये मोठी गर्दी होत असते, यंदाच्या वर्षी देखील अनेक व्यापाऱ्यांनी दिवाळी सणासाठी मोठी उलाढाल केली असुन बाजारपेठे मध्ये सर्व प्रकारची दुकाने लावण्यात आली आहे. दिपावलीसाठी लागणारे आकाशकंदील , रांगोळी , पणत्या , खाद्य पदार्थ , कपडे , पुजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची आदी दुकाने बाजारपेठेत लावण्यात आली असुन , ग्राहकांचा मात्र खरेदीसाठी अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सध्याचे युग हे डिजिटल असल्याने याचे परिणाम हे सणामध्ये बाजारपेठेत होणाऱ्या खरेदीवरही जाणवत आहे. आज कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडे मोबाईल फोन आल्याने त्यांच्यासाठी ऑनलाईन बाजारपेठ वापरणे सोपे झाले आहे. सणानिमित्ताने सर्वच कंपन्या या ऑनलाइन खरेदीवर कमी किंमती सह आकर्षक सूट देत असतात , यामुळे साहजिकच नागरिक याकडे आकर्षित होऊन खरेदी करत असतात, परिणामी प्रत्येक शहरातील बाजारपेठेवर याचे परिमाण होऊन ग्राहक कमी होत आहे.