गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आणि दुसरीकडे पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. दरम्यान आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीतून एक महत्वाचे नाव काढून टाकण्यात आले आहे.त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून ओळख आहे. मात्र गुजरात निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, मात्र अमोल कोल्हे यांचं नाव नसल्याने आता चर्चांना चांगलंच उधाण आल्याचे पहायला मिळत आहे.
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीवर नाराज असून येत्या काळात ते मोठा निर्णय घेऊ शकतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी अमोल कोल्हे गैरहजर राहिले होते.यानंतर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आणखी वाढल्या आहेत. तसेच, मागच्या 3 वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात वेळ देत नाहीत, असा आरोप होत आहे.
त्यातच मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या सेलिब्रिटी असल्यामुळेही अडचण होत असल्याचं बोललं जातं, त्यामुळे अमोल कोल्हे यांना मतदारसंघात विरोधकांसोबतच पक्षातील नेत्यांकडूनही टीकेला सामोरं जावं लागतं.अमोल कोल्हे मधल्या काळात भाजपमधील केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या भाजपसोबतच्या जवळीकीला दुजोरा मिळतोय. काहीच दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला,यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. ही भेट देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना खुपली होती, तर दुसरीकडे भाजप कार्यकर्ते मात्र अमोल कोल्हे यांचं स्वागत करत आहेत.