PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून चार मुख्य परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे, असे एमपीएससीने जाहीर केले आहे.
२४ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ हा पुढे ढकलण्यात आला आहे. सोबतच ३१ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा, ७ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २, राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा आणि १४ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील एक प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील आयोगाने म्हटले आहे.