loader image

मनमाड मधील महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या कामाचा शुभारंभ

May 21, 2023


वर्षानुवर्षांपासून मनमाड शहरातील प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकांचे काम शनिवार (ता. २०) तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे शहरात असावे ही मागणी अनेक वर्षांपासून होती. त्याअनुषंगाने आमदार कांदे यांनी प्रयत्न करत स्मारकाच्या कामाचा शुभारंभ केला.

आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेघडंबरीत पूर्णाकृती पुतळा तर शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्थानकासमोर युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर समोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा स्मारकाचे आमदार सुहास कांदे यांनी जागेवर कुदळ मारून भूमिपूजन केले.

शहरात दोन युगपुरुषांचे पूर्णाकृती पुतळे तर साहित्यरत्न असलेल्या थोर व्यक्तीचे अर्धाकृती पुतळा उभारला जाणार आहेत. ही शहरवासीयांसाठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे.

या तिन्ही पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी आमदार सुहास कांदे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून आता पुतळ्यांच्या कामाचे भूमिपूजन झाले. लवकरच चौथऱ्याचे काम होऊन सुशोभीकरण होऊन पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा लवकरच होईल. महापुरुषांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनप्रसंगी शहरातील मान्यवर उपस्थित होते. पुतळा उभारणीसाठी शासनाने सर्व मंजुरी दिली आहे. पुतळे बनून तयार झाले आहे.

यावेळी आमदार सुहास कांदे म्हणाले की, या तीनही पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यांचे विचार नेहमीच समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांच्या ऐतिहासिक कार्याची, विचारांची आठवण म्हणून मनमाड शहरात महापुरुषांचे पुतळे उभारले जात आहे. यावेळी राजेंद्र पगारे, राजेंद्र अहिरे, फरहान खान, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, दिलीप नरवडे, साईनाथ गिडगे, मयूर बोरसे, सुनील हांडगे, योगेश पाटील, अल्ताफ खान, कैलास अहिरे, संतोष अहिरे, नितीन पांडे, जय फुलवाणी यांच्यासह विविध संस्था संघटना आणि सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

.