loader image

दृष्टिक्षेप विश्वचषक 2023 विशेष लेख संदीप देशपांडे

Oct 23, 2023


 

कोहली हैं..कोहली हैं….

अखेर भारतीयांनी ती हिम्मत दाखवलीच….. बलाढ्य न्यूझीलंड ला धर्मशालेच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर आपण अस्मान दाखवले. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड ला शिकस्त देणे ही गोष्ट टीम इंडियाच्या कर्तबगारीवर शिक्कामोर्तब करणारी ठरावी. या बद्दल रोहित च्या जिगरबाज शिलेदारांचे कौतुक करायला हवे. खरे तर नाणेफेक जिंकून कर्णधार रोहितने क्षेत्ररक्षण पत्करणे हा निर्णयच सुरुवातीला पचनी पडत नव्हता. किंवीं विरोधात आपली यापूर्वीची कामगिरी पहाता हा निर्णय बुमरॅग तर ठरणार नाही ना..असेच वाटत होते. सुरुवातीच्या 2 विकेट लवकर गेल्यावर रोहित चा निर्णय योग्य वाटू लागला ,पण मिशेल व राचीन
च्या भागीदारीने भारतीय गोलंदाजांची पार पिसे काढली. नेहमी प्रभावी ठरलेल्या भरवशाच्या कुलदीप यादव चे चेंडू
किंवींच्या स्टंप किंवा पॅड ला लागण्याऐवजी थेट बॅट ला लागून थेट स्टेडियमच्या बाहेर जाताना पाहिल्यावर किंवीं फलंदाजांचे वर्चस्व जाणवू लागले. मात्र शामी ने संधीचे सोने केले. भारतीय गोलंदाजांना यॉर्कर पण टाकता येतात हे बुमराह नंतर शामीने काल लीलया दाखवत वळवळणाऱ्या किंवीं फलंदाजीला
कापून टाकले. शेवटच्या दोन तीन षटकात कुलदीपला सूर गवसला.हे भारताच्या पथ्यावर पडले. सिराज व जडेजाने अचूक मारा करत बलाढ्य फलंदाजीला आवर घातला. खरे तर तीनशे ,सव्वा तीनशे चे टार्गेट होईल असे चित्र असताना शामी च्या तुफानाने न्यूजीलंड ला उध्वस्त करत 273 मध्ये रोखले, या ठिकाणी च भारताच्या विजयाची जणू मुहूर्त मेढ रोवली गेली. असे असले तरी न्यूझीलंडचा तेज तर्रार वेगवान गोलंदाजींचा मारा व फिरकीचा नेमका तडका यामुळे भारत हे आव्हान कसे पेलेल ,याची चिंता होतीच..भय इथले संपत नाही, म्हणतात ना..त्या प्रमाणे धाकधूक होतीच… पण रोहित,शुभमनच्या चांगल्या सलामीने आशा पल्लवित केल्या. चांगलं खेळत असताना अचानक विकेट फेकणे भारतीयांनी सोडले पाहिजे. फर्ग्युसन च्या बाहेरच्या चेंडूला आमंत्रण देत रोहितने स्वतःच्या चांगल्या खेळीची आत्महत्या घडवून आणली. एका मोक्याच्या क्षणी गिलच्या संयमित फलंदाजीनेही खेळपट्टीवरून अकस्मात निरोप घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर असे धक्के बसल्यावर न्यूझीलंड परत आपल्या परंपरेला जागणार असे वाटू लागणे, साहजिकच होते.
कमबॅक करण्यात माहीर असलेल्या न्यूझीलंडने आपला दबदबा निर्माण करायला सुरुवात केली पण कोहली नावाचा विश्वास दर्शक ठराव प्रत्यक्षात संमत व्हायचा होता..”कोहली हैं कोहली हैं….कोहली हैं तो क्या नामुमकीन हैं” हे त्रिबाधीकालीत सत्य पुन्हा प्रत्यक्षात उतरले. श्रेयस, राहुल व जिगरबाज जडेजा ला घेऊन कोहलीने भारताला एका अशक्य प्राय विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. त्याचे शतक झाले नाही यामुळे करोडो भारतीय हळहळले, पण विश्वचषकात विजयाचा खुमार आपण कायम ठेवला, पाचही सामने जिंकून गुण तालिकेत पहिल्या क्रमांकावर आलो, याचा अभिमान ,आनंद त्यांच्या मनामनात भरून राहिला. कोहली व जडेजाने किंवीं ना धुतले आणि धावांचा पाठलाग करताना, चेस करताना
भारतीय ढेपाळतात असे म्हणणाऱ्या टिकाकारांचे थोबाड ही बंद केले. ऑस्ट्रेलिया,पाकिस्तान पाठोपाठ बलाढ्य न्यूझीलंड ला आपण पराभूत केले हे विश्वचषक जिंकण्याच्या मोहिमेतील आश्वासक पाऊल आहे. आता आहे विजयाची ही पताका अशीच पुढे नेण्याची…..

हे मात्र टाळले पाहिजे. भारतीय संघाला आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत
धडक मारण्यासाठी चूका दुरुस्त कराव्या लागतील. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात काही सोपे झेल सुटले. क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे काही धावा अक्षरशः उधळल्या गेल्या. चेंडू मागे पळण्याचे तंत्र बुमराहने आत्मसात केले पाहिजे. रनिंग बिटविन द विकेट सुधारले पाहिजे. लेझीम खेळल्या सारखा क्रिज च्या आत बाहेर करणाऱ्या सुर्यकुमार ला हे सांगावे लागेल. त्याची विकेट तर विनाकारण गेल्याने दडपण आले पण कोहली जडेजाने नवरात्रात विजयाचा बेडा पार करत अष्टमीची अफलातून भेट दिली. आता फक्त थोडा है थोडे की जरूरत हैं… वर्ल्ड कप सेमी फायनल समीप आहे, आणि कोहली हैं तो नामुमकीन हैं…….


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.