loader image

जिगरबाज लढले……क्रिकेट जिंकले…… बंगलोरचा पाऊस ठरवणार पाकिस्तानचे भवितव्य….

Nov 8, 2023


दृष्टीक्षेप संदीप देशपांडे

वर्ल्ड कप स्पेशल

मंगळवारची वानखेडे स्टेडियम वरची ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान लढत म्हणजे रोमांचक क्रिकेटचा भव्य दिव्य नजाराच……ऑस्ट्रेलिया कडून कायम दुय्यम व दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानने कांगारू मंडळींची अशी अवस्था केली की त्यांना स्वप्नातही वाटले नसेल की 291 चा पाठलाग करताना शंभरीच्या आत 7 विकेट्स जातील….खरे तर ऑस्ट्रेलियाला हरवून अफगाणिस्तान इतिहास घडवणार होते पण ग्लेन मॅक्सवेल नावाचे वादळ आले, त्याच्या बॅटच्या सुनामीच्या तडाख्यात रशीदच्या मेहनती शिलेदारांची गोलदांजी सापडली आणि या सुनामीत आधी 7 विकेट्स घेऊन इतिहासाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजीच्या व स्वप्नांच्या पार चिंध्या चिंध्या झाल्या. सेमी फायनलचे गणित सोपे होता होता अवघड झाले, अशक्यप्राय वाटणारा विजय मॅक्सवेलने एकहाती खेचून आणला, निवडणुकीत एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असे वाटत असतांना त्याने पराभव दूर सारत विरोधकांची पिसे काढत विजयश्रीला गवसणी घालावी. तसाच हा परफॉर्मन्स… या सामन्यात कोणती टीम जिंकली, कोणती हरली या पेक्षा क्रिकेट ने बाजी मारली.ते जिंकले, असे म्हणावे लागेल. ऑस्ट्रेलिया चा कर्णधार पॅट कमिन्स ने खेळपट्टीवर टिच्चून उभे राहत मॅक्सवेलच्या झंझावातासारख्या पुढे जाणाऱ्या गलबताला शिड उभारण्याचा कॅप्टन नॉक बजावला.हे विशेष…… झिम्बामबे ने काही वर्षांपूर्वी भारताची अवस्था 17 वर 5 विकेट्स अशी केली असताना कर्णधार कपिलदेव ची 175 ची स्फोटक खेळीच आठवली काल राव……मॅक्सवेल च्या अंगात कपिल, विव्ह रिचर्ड , क्रिस गेल हे सगळे तुफानी अवतार संचारले असावे ,असे वाटत होते..हॅट्स ऑफ ऑस्ट्रेलिया…. अर्थात मुजीब ने सोडलेला तो मॅक्सवेल चा झेल हाच या इतिहासाचे कारण ठरला. दुर्दैव रशीद च्या जिगरी टीमचे…
आता या अफगाणिस्तान च्या पराभवाने न्यूझीलंड, पाकिस्तान यांचे आव्हान जिवंत करण्याचे, त्यांच्यात जान ओतण्याचे काम केले आहे. भारत ,दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाचा सेमी फायनल चा मार्ग मोकळा दिसत असताना आता चवथ्या क्रमांकावर कोण ? हा प्रश्न जास्तच अवघड बनला आहे. ऑस्ट्रेलियाची फे फे उडविणाऱ्या अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवण्याचा राणा भीमदेवी थाटातला पराक्रम करायला हवा. त्यांच्या सह पाकिस्तान व न्यूझीलंड देखील सेमी चे दावेदार आहेत, खरे तर सेमी फायनल साठी न्यूझीलंडला जास्त संधी आहे,कारण त्यांचा सामना श्रीलंकेशी आहे, इंग्लंड ची सुमार कामगिरी पाहता पाकिस्तान संघाचे पारडे जड आहे, पण न्यूझीलंड जिंकल्यास पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावे लागेल हे उघड आहे. पण कहानी मे थोडा ट्विस्ट हैं जनाब… न्यूझीलंड श्रीलंका सामना बंगलोर ला आहे,
तिथे पावसाची बॅटिंग सुरू आहे, हा सामना झाला नाही तर न्यूझीलंड ला केवळ एक गुण मिळेल व पाकिस्तान साठी सेमी चा दरवाजा थोडा किलकिला होईल. अफगाणिस्तान साठी करा वा मरा स्थिती असेल. आफ्रिकेचे बलाढ्य आव्हान पेलताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऐतिहासिक पराभवाचे दुःख रशीद कंपनीला दूर ठेवावे लागेल ,पार विसरावे लागेल…. क्रिकेटची हीच जादू आहे. चमत्कार,रोमांच, अद्भुतता या खेळात ठासून भरलीय… त्यामुळे पुढचे काही दिवस क्रिकेट शौकिनांसाठी मोठी दिवाळी घेऊन येतील,यात शंका नाही.. बंगलोर मध्ये ये रे ये रे पावसा असे गीत पाकिस्तान ला म्हणावे लागेल तर न्यूझीलंड देव पाण्यात घालून नको नको रे पावसा ची आळवणी करत असेल… मॅक्सवेलला सलाम आणि हॅट्स ऑफ टू क्रिकेट…..


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.