तुल्यबळ लढतीत भारताचे पारडे जड , पण चुका टाळाव्या लागतील . आणखी एका ऑलरॉउंडर ची उणीव भासणार?
विश्वचषक 2023 चा विजेता कोण ठरणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे . तसे पाहिले तर फायनल ला भारताबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ आला असता तर भारताला फायनल जिंकणे सोपे झाले असते,असे अनेकांना वाटत होते. आणि ऑस्ट्रेलियाचा दबदबा पहाता ते योग्य ही होते. भारताची बलाढ्य कांगारू संघा बरोबर फायनल ला गाठ पडली .आणि लगेचच या दादा लोकांबरोबर कसा निभाव लागणार? याचीही चर्चा रंगू लागली. पण ऑस्ट्रेलिया भारी टीम असेल तर आपण ही काही कच्चा लिंबू नाही. उलट या वर्ल्ड कप मध्ये आपणच खरे दादा ठरलो आहोत. बॅटिंग, बॉलिंग मध्ये आपलीच दादागिरी चाललीय,
2023 च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता कोण ? याची आता सर्वांना प्रतिक्षा आहे.
याच स्पर्धेत आपण ऑस्ट्रेलियाच्या नाकात दम आणून त्यांना चारी मुंड्या चित केले होते,हा इतिहास अगदी ताजाच आहे. लढाऊ वृत्तीने संघभावना व परफॉर्मन्स च्या जोरावर आपण इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतो.ही खूणगाठ मनात बांधूनच रोहित सेनेने मैदानात उतरले पाहिजे. दोन्ही संघाची तुलना करता ऑस्ट्रेलियाने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे तर आपण दोनदा… ऑस्ट्रेलिया संघात स्फोटक फलंदाज आणि घातक गोलंदाज यांचा भरणा तुलनेत जास्त आहे, हे देखील नाकारून चालणार नाही . वर्ल्ड कप विजेते पदाचा अनुभव तसेच आणीबाणीच्या वेळी निर्धाराने परिस्थिती हाताळण्याची व पराभव समोर दिसत असताना विजयश्री खेचून आणण्याची क्षमता पॅट कमिन्स च्या ऑस्ट्रेलिया संघाकडे आहे . त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलिया ला
अस्मान दाखविण्यासाठी चांगले डावपेच,व्यूहरचना व त्या नुसार खेळ करावा लागणार आहे. राहुल द्रविड आणि कंपनीने त्यासाठी मोठा होमवर्क केला असेल,असे गृहीत धरू या… आधी बॅटिंग केली तर भारताला जिंकण्याची जास्त संधी हे अनुमान असले तरी
भारताची वर्ल्ड कप मधली फलंदाजी पाहता त्यावर विश्वास ठेवून दुसरी इनिंग खेळायची वेळ आली तरी कच न खाता , मोठया निश्चयाने फायनल जिंकण्याच्या इराद्यानेच पाऊल पुढे टाकले पाहिजे. आपली फलंदाजी रोहित,शुभमन यांच्या चांगल्या सलामी भागीदारी वर अवलंबून राहते,त्यात विराट च्या सातत्य पूर्ण खेळीची भर पडते. रोहित ने त्याची हिट मॅन परंपरा जपली पाहिजे,पण ती जपत असताना उतावीळपणे चुकीचा फटका मारून विकेट फेकणे, सोडायला हवे . धावगती वाढवणे ,लौकिकाला साजेसा खेळ करणे,हे जरी मान्य केले तरी
मोठी खेळी करण्यासाठी चांगल्या फटक्यांचे सिलेक्शन हवे. मायकेल स्टार्क,कमिन्स,हेजेलवुड या तोफखान्या समोर रोहित,शुभमन,गिल या तिघांचा परफॉर्मन्स की फॅक्टर ठरू शकतो. या विकेट लवकर गेल्या तर श्रेयस ,सुर्यकुमार व जडेजा वर मोठे दडपण येऊ शकते. या साठी आपल्या पहिल्या तीन विकेट लवकर जाऊ नये, हेच महत्वाचे आहे.ऑस्ट्रेलिया व भारतीय फलंदाजीत मोठा फरक म्हणजे त्यांची शेवट पर्यंत फलंदाजी आहे. सेमी फायनल मध्ये दिग्गज फलंदाज तंबूत परतले,7 विकेट गेल्या तरी पॅट कमिन्स व स्टार्कने जवळपास 14 ते 15 ओव्हर खेळून काढल्या. सामना जिंकून दिला. आपल्या शेवटच्या बॅटिंग ची बोंबाबोंब आहे,हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही. बुमराह,शामी, कुलदीप व सिराज यांचा बॅटिंग मधला परफॉर्मन्स या पूर्वीही अपवादानेच दिसला आहे, फायनल जिंकण्यासाठी वेळ पडली तर आपल्या शेपटाने पण वळवळले पाहिजे. त्यांनी पण जबाबदारीने, संघाची गरज ओळखून बॅटिंग केलीच पाहिजे. तरच ऑस्ट्रेलियाला खऱ्या अर्थांने बराबर की टक्कर दिली जाऊ शकेल. हार्दिक पंड्या नसल्याने एका अष्टपैलू खेळाडूची उणीव भासतेय ,हे नक्की..! तसे पाहिले तर भारताने क्षेत्र रक्षणात सुधारणा केल्या पाहिजे, न्यूझीलंड विरुद्ध ओव्हर थ्रो चा खुराक दिला आपण… त्यात काही झेल महत्वाच्या वेळी सोडले गेले, रन आऊट च्या काही संधीही गमावल्या आपण…. आणीबाणीच्या वेळी ढेपाळून
जाणे, संयम सोडणे काही कामाचे नाही. याचा विचार फायनल ला झालाच पाहिजे. तरच विश्वचषकावर नाव कोरता येईल. मोहम्मद सिराजच्या फिल्डिंग व गोलंदाजीत सुधारणा अपेक्षित आहेत. एकूण काय तर भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध कडक मुकाबला देण्यासाठी सज्ज आहे, संघ समतोल आहे, पण थोडा हैं ,थोडे की जरूरत हैं..बहुतेक विनिंग कॉम्बिनेशन तेच ठेवले जाईल. सुर्यकुमार ने आपल्या नावाला साजेसा खेळ करण्याची वेळ आता आलीय,असं वाटते. एकूण काय तर निर्विवाद 9 विजय व सेमी फायनल जिंकून अंतिम फेरीत गेलेल्या भारताला
थोडा हैं ,थोडे की जरूरत हैं’ असेच म्हणावे लागेल. तसे झाले तर विश्वचषक आपलाच……💐💐
