महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. आज 23 फेब्रुवारी पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. दोनच दिवसांपूर्वी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी मनोहर जोशींना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, या उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला. मुंबईतील किर्ती कॉलेजमध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी पूर्ण केली. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्कची नोकरी केली. मनोहर जोशी यांना उद्योजक होण्याची इच्छा असल्यामुळे दूध, फटाके, हस्तीदंतीच्या वस्तूंच्या विक्रीचे अनेक व्यवसाय त्यांनी करुन पाहिले. 2 डिसेंबर 1961 ला नोकरी सोडून कोहिनूर क्लासेसला सुरुवात केली. आज कोहिनूर ग्रुप शिक्षणाबरोबरच हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम क्षेत्रात कार्य करत आहे. 1967 साली शिवसेनेत प्रवेश करून दोनदा नगरसेवक, तीनदा विधानपरिषद सदस्य, 1976-77 मध्ये मुंबईचे महापौर, दोनदा विधानसभा सदस्य, 1990-91 मध्ये विरोधी पक्षनेते पद अशी पदे त्यांनी भूषविली. 1995 मध्ये शिवसेना भाजपाच्य युतीचे सरकार सत्तेत आले तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर 1999-2002 दरम्यान अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री, 2002-2004 दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष आणि 2006-2012 राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...