योगेश म्हस्के
मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित मनमाड येथील महर्षी वाल्मिकी क्रिडा संकुल येथे सुरू असणाऱ्या कीर्तन सोहळ्यात उपस्थित 4 ते 5 हजार भाविकांना अक्षय तृतीया निमित्ताने “खीर-मांड्यांचा” महाप्रसाद देण्यात आला.
गेल्या 4 मे पासुन सुरू झालेल्या या सोहळ्यामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी उपस्थित भाविकांना महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांच्या किर्तनाच्या पर्वणी बरोबरच विविध प्रकारच्या पदार्थांच्या महाप्रसादाची देखील मेजवानी प्राप्त होत आहे.काल अक्षय तृतीया सणानिमित्ताने सोहळ्याच्या समितीच्या वतीने मनमाड पंचक्रोशीतील गावांना आपल्या परीने महाप्रसादासाठी मांडे घेऊन येण्याचे आव्हान करण्यात आले होते. या आव्हानाला भाविकांच्या वतीने उत्तम प्रतिसाद देण्यात येऊन जवळ-जवळ 6 ते 7 हजार भाविक भोजन करतील एवढ्या स्वरूपात मांडे प्राप्त झाले होते.
या सोहळ्यामध्ये आज सकाळी 10 ते 12 हभप उमेश महाराज दशराथे आणि सायंकाळी 6 ते 8 हभप महादेव महाराज राऊळ यांचे कीर्तन होणार असुन, उद्या सकाळी 9 ते 11 हभप एकनाथ महाराज सदगीर यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे.
मनमाड शहरात आयोजित करण्यात आलेल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशा अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्याच्या शेवटच्या 2 दिवसांसाठी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान श्री संत एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.