चांदवड – शाळांच्या सुट्यांमध्ये सहकुटुंब बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घराला एका चोरट्याने लक्ष केल्याचा प्रकार चांदवड शहरातील गुरुकुल कॉलनीत बुधवारी (दि. २२) घडला. अज्ञाताने भरदिवसा तब्बल सहा घरफोड्या केल्या असून त्यातील एका घरमालकाच्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, संशयित भामटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. अण्णा भगवान पवार (४५, रा. बालाजी अपार्टमेंट) यांनी फिर्याद नोंदवली आहे.
शहरातील बसस्थानकामागे असलेल्या घोडकेनगर, गुरुकुल कॉलनीत बुधवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास अज्ञाताने सहा बंद घरांमध्ये चोरी केली. बालाजी अपार्टमेंटमधील अण्णा पवार यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. बेडरूममध्ये ठेवलेली १० हजार रुपयांची ५ ग्रॅम वजनाची अंगठी, २० हजार रुपये किमतीचा १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस व तीन हजारांची रोकड असा ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.या चोरट्याचा चांदवड पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.