आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली. यावेळी सेंट विनसेट मुलींचे वसतिगृह आणि सेंट झेवियर मुलांचे वसतिगृह येथे त्यांनी वसतिगृहातील मुला-मुलींशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी मुलांना विशेष संदेशपर मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,देव तुम्हावर खूप प्रेम करतो! हो, खरंच! देव तुम्हाला पाहतो, तुमच्या हसण्याकडे, खेळण्याकडे, अभ्यासाकडे – सगळं पाहतो. तो तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. जेव्हा तुम्ही दुःखी असता, तो तुमच्यासोबत असतो. जेव्हा तुम्ही आनंदी असता, तेव्हा तो हसतो. म्हणून नेहमी प्रार्थना करा, “देवा, धन्यवाद! तू मला इतकं प्रेम दिलंस!” आणि इथे, या आपल्या शाळेत, आपले फादर,आपले सिस्टर्स हे देवाचे खास दूत आहेत. ते तुमच्यासाठी प्रार्थना करतात, तुम्हाला चांगलं शिकवतात.प्रसंगी
तुमच्या चुका दाखवतात पण रागावत नाहीत. त्यांचं प्रेमही देवाचंच प्रेम आहे. त्यांना मान द्या, त्यांचं ऐका.आणि आई-बाबांना सांभाळा! ते तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात तसेच हे ठिकाण देखील विसरू नका! ही शाळा, हे मित्र, हे शिक्षक, हे सगळं तुमचं कुटुंब आहे. इथे शिकलेलं चांगलं वागणं, प्रेम, शिस्त – हे आयुष्यभर सोबत राहील. जिथे जाल, हे ठिकाण आठवा. इथले आपले फादर,आपले सिस्टर्स, आपले शिक्षक,इथले मित्र सगळ्यांना आठवा.
मुलांनो, तुम्ही देवाची खास मुले आहात! चांगले राहा, प्रेम करा, अभ्यास करा, खेळा, हसा… आणि नेहमी आनंदी राहा! देव तुमच्यासोबत असो! धन्यवाद !
असे मार्गदर्शन करून त्यांनी सर्व मुलां-मुलींना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य भेट दिले.यावेळी फा.मॅलकम,फा.विवेक,ब्र.प्रताप,श्री.पाटील तसेच सि.रोझ, सि.पुष्पा उपस्थित होते.











