बनावट कागदपत्रे तयार करून होणारी फसवणूक आणि एकाच मिळकतीची वारंवार होणारी बेकायदेशीर दस्तनोंदणीला कायमस्वरूपी आला बसावा म्हणून शासनाने मोठे पाऊल उचलले आहे.
जमीन किंवा घराची खरेदी-विक्री करताना दस्त नोंदणीसाठी आता नागरिकांना प्रत्यक्ष सातबारा उतारा किंवा मिळकत पत्रिका सोबत घेऊन जाण्याची अथवा सादर करण्याची गरज भासणार नाही. दस्त नोंदणीच्या वेळी सिस्टीममधूनच थेट ‘रिअल टाइम’ सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध (ऑटो-फेच) होणार आहे.
यासाठी भूमी अभिलेख (महाभूमी) आणि नोंदणी व मुद्रांक विभाग यांची संगणकीय प्रणाली एकमेकांशी जोडण्यात (इंटिग्रेशन) आली आहे. पुढील आठवड्यात ही सुविधा पूर्णपणे सुरू होणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी दिली. या निर्णयामुळे बनावट कागदपत्रे तयार करून होणारी फसवणूक आणि एकाच मिळकतीची वारंवार होणारी बेकायदेशीर दस्तनोंदणी कायमची बंद होणार आहे.












