सा.मनमाड ठिणगी या वृत्तपत्राचे संस्थापकीय संपादक पत्रकार, लेखक स्वर्गीय प्रकाश गोयल यांचे ७१ व्या जयंती स्मृती दिनानिमित्ताने श्री संकल्प प्रतिष्ठान तर्फे संस्थापक अध्यक्ष तुषार गोयल यांनी IAS प्रेरणा आणि अनुभव (प्रशासनात कार्यरत 21अधिकाऱ्यांच्या प्रेरक कथा) या लेखिका सौ.प्रतिभा बिस्वास लिखित पुस्तकाच्या दोन प्रति मनमाड सार्वजनिक वाचनालयास सप्रेम भेट दिल्या.
मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे वाचनालयचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा यांनी या भेटीचा स्वीकार केला. मनमाड शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत निस्वार्थी योगदान देणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याला सहकार्य म्हणून वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ हे ग्रंथ वाचनालय भेट दिल्याचे या प्रसंगी तुषार गोयल यांनी सांगितले तर मनमाड सार्वजनिक वाचनालयाने दानशूर दात्याच्या सहकार्यनेच कोविड सारख्या अत्यंत कठीण काळातही वाचन संस्कृती टिकवली आहे, असे सांगत वाचनालयाच्या वतीने सचिव कल्पेश बेदमुथा यांनी आभार व्यक्त केले.
या संवेदनशील कार्यक्रमास शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, श्री संकल्प प्रतिष्ठानचे आनंद बोथरा, सचिन बाविस्कर, तुषार आव्हाड, महेश बोराडे, मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी यांचे सह वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.