पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. कायद्याच्या ज्या तरतूदीवर त्यांचा आक्षेप होता. तो बदलायला आम्ही तयार होतो. आम्ही दोन वर्षासाठी कायदे सस्पेंड करण्याचाही निर्णय घेतला. आम्ही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही, आज प्रकाशपर्व आहे. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस संसदेच्या अधिवेशनात ही कायदे रिपील करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, असं सांगतानाच शेतकऱ्यांनी आता आंदोलन करू नये. त्यांनी आपआपल्या घरी जावं. शेतावर काम करावं, असं आवाहन मोदींनी केलं.
मागे घेण्यात आलेले कायदे :
1) कृषी उत्पादने,व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
2) हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020
3) जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020
दीड वर्षानंतर करतारपूर साहीब कॅरिडोअर पुन्हा उघडला आहे. गुरुनानक म्हणाले होते की संसारात सेवेचा मार्ग अवलंबल्यानेच जीवन सफल होतं. आमचं सरकार याच भावनेतून देशवासियांची सेवा करत आहे. अनेक पिढ्या जी स्वप्नं पाहत होती. भारत आज ती स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पाच दशकाच्या सार्वजनिक जीवनात मी शेतकऱ्यांच्या अडचणी जवळून पाहिल्या आहेत. समजल्या आहेत. त्यामुळे 2014मध्ये पंतप्रधान म्हणून सेवेची संधी मिळताच कृषी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. देशाच्या 100 पैकी 80 शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. हे वास्तव आहे. ही संख्या 10 कोटीपेक्षा अधिक आहे. ही जमीन हेच त्यांच्या जीवनाचा आधार आहे. हेच त्यांचं आयुष्य असतं. ते याच जमिनीच्या माध्यमातून कुटुंबाचा पालनपोषण करत असतात. मात्र, कुटुंब वाढतं तसंच त्यांची शेती कमी होते. त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी बियाणे, बचत आणि बियाणांवर आम्ही काम केलं, असं त्यांनी सांगितले.