मनमाड शहर व परिसरातून दैनंदिन कामानिमित्त / उदरनिर्वाहासाठी / व्यापारासाठी तसेच दवाखान्याच्या निमित्ताने दररोज हजारो नागरिक नाशिक व मुंबई प्रवास करतात. परंतु कोव्हीड-१९ (कोरोना व्हाईरस) च्या प्रार्दुभावामुळे २२ मार्च पासुन लागु झालेल्या लॉकडाऊन मुळे सर्व रेल्वे बंद झाल्या. परंतु १ सप्टेंबर २०२० पासुन कोव्हीड – १९ चा प्रादुर्भाव कमी कमी होत गेल्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हळु हळु पूर्वपदावर आली आहे. रेल्वे प्रशासनाने ०१ ऑक्टोंबर २०२० पासून प्रवाशासाठी शासनाच्या SOP नुसार रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशाला प्रवास करता येईल अशी अट घालुन सदर गाडी सुरु केली. मात्र यामुळे नियमित ये-जा करणारे चाकरमाने, सर्व साधारण प्रवाश्यांची असुविधा व गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने त्वरित गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरु करावी, या मागणीचे निवेदन मनमाड शहर वेलफेअर असोसिएशन व रेल्वे प्रवासी संघटने तर्फे देण्यात आले आहे.
अनलॉकची परिस्थिती पाहता आज महाराष्ट्रात सर्व व्यापार, शासकीय, निमशासकीय, खाजगी कर्मचारी, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सुविधा पुरविणारे दवाखाने, डॉक्टर्स, नर्सेस, इंजिनिअर्स, वकील, हातावर काम करणारे मोलमजूर, दुकाने, हॉटेल, अत्यावश्यक व आवश्यक सेवा सुविधा पुरविणारे कार्यालय सुरु झालेले आहे. परंतु यात काम करणारे नियमित चाकरमाने सुद्धा आहेत.
मनमाड शहरामध्ये वैद्यकीय सुविधा परिपूर्ण नसल्यामुळे आठवड्यातून किमान चार वेळेस उपचारासाठी नासिक व मुंबई येथे जावे लागते. परंतु आज मितीस प्रवासी व नियमित ये-जा करणारे चाकरमाने यांना पंचवटी एक्स्प्रेसचा तुटपुंज प्रवास सेवा (SOP) यामुळे अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पंचवटी बरोबरच, गोदावरी एक्स्प्रेस सुरु करण्याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेने वेळोवेळी विनंती अर्ज, निवेदने, मागणीचे पत्र रेल्वे प्रशासन तसेच जन प्रतिनिधी (एम.पी., एम.एल.ए.) यांना लेखी व प्रत्यक्ष भेटुन दिलेले आहे. तसेच गोदावरीला एक स्वतंत्र टि.सी. व आर.पी.एफ. तसेच मनमाड स्टेशनसाठी मासिक पास खिडकी सुरु करण्याबाबत देखील अनेकदा मागणी केली आहे. परंतु आजपावेतो संबंधीत रेल्व प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडुन कुठल्याही प्रकारचा होकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशी व ये-जा करणारे चाकरमान्यांना तिव्र आंदोलन छेडल्याशिवाय अन्य दुसरा पर्याय राहणार नाही. नांदगाव, मालेगांव, येवला आणि कोपरगांव तालुक्यातून कमीत कमी ६००० प्रवासी अप-डाऊन करतात त्यामुळे सगळ्या तालुक्यात अडचण निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित यावर निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शहर वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र पारिक, रेल्वे प्रवासी संघटनेचे नरेंद्र खैरे, मुकेश निकाळे, आदींच्या सह्या आहेत.












