नाशिक जिल्ह्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले, धरणे व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे. हा आदेश काल (दि. 19) पासून लागू झाला असून, पुढील आदेश येईपर्यंत तो कायम राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी दिली.
या आदेशानुसार ब्रह्मगिरी व अंजनेरी पर्वत, दुगारवाडी धबधबा, हरिहर, पहिने, साल्हेर किल्ले, भास्करगड व रामशेज किल्ला, भावली आणि वैतरणा धरण, गंगापूर धरण या सर्व ठिकाणी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 व भारतीय दंड संहिता-1860 कलम 188 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान राज्यशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दि. 14 जानेवारी रोजी बैठक होऊन त्यात नाशिक जिल्ह्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रसार पाहता वरील सर्व पर्यटनस्थळे, किल्ले व धरणांवर पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांना अनिश्चित काळासाठी जमावबंदी व संचारबंदीचे निर्देश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश फक्त शासकीय सेवा व अत्यावश्यक सेवेशी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना लागू राहणार नाहीत.










