मनमाड : (योगेश म्हस्के) पावसाळा ऋतू सुरू झाला की दरवर्षी शहरातील नागरिकांना विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागते , यंदाही पावसाळा सुरू झाल्यावर मनमाड शहरात विजेची समस्या निर्माण होऊन शहरातील अनेक भागातील नागरिक हे गेल्या दोन दिवसांपासून घरात विज नसल्याने अंधारात आहे.मनमाड शहर हे काही वर्षांपासून झपाट्याने वाढत आहे , शहरातील अनेक बाह्य भागात नवीन वसाहती निर्माण होऊन शहराची लोकसंख्या वाढत असुन या भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे , शहरामध्ये पाणी समस्या अनेक वर्षांपासून असल्याने अनेक नागरिकांना पाण्यासाठी बोअरवेलचा आधार आहे , पण दोन दिवस वीज गेल्यास नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड हाल होत असते.
शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊन अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे , शहरातील वीज कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्या मर्यादित असल्याने विज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विलंब होत आहे , नागरिक हे वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी वीज कार्यालयात तक्रार आणि विचारणा करण्यासाठी गर्दी करत असुन नागरिक आणि येथील कर्मचाऱ्यांचे अनेक वेळा वाद देखील होत असतात.
अनेक भागातील वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी वीज मंडळ आणि नागरिकांना खासगी कर्मचाऱ्यांची मदत घेण्याची वेळ येत असुन , विज मंडळाकडून शहराची रचना बघता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.
(मुरलीधर नगर मित्र मंडळाच्या वतीने परिसरातील बंद असलेला विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करणाऱ्या विज कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.)
















