पोलिस ठाण्यातील वातावरणाचा बालकांवर विपरीत परिणाम होऊ नये, बालकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे गंभीर गुन्ह्यात सापडलेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन व्हावे तसेच त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होण्याच्या उद्देशाने मनमाड पोलीस स्थानकात नाशिक ग्रामीणचा पहिला बालस्नेही कक्ष उभारला आहे. या कक्षाचे उदघाटन आज मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
मनमाड पोलीस ठाण्याच्या आवारातील एका खोलीत बालस्नेही कक्ष सुरू करण्यात आला आहे. एरवी पोलीस ठाण्याचे आवार म्हटले की डोळ्यासमोर गणवेशातील पोलीस, पोलिसांच्या गाड्या, पोलीस ठाण्यातील गोंधळ दृष्टीस पडतो. मात्र, बालस्नेही कक्ष पूर्णपणे वेगळा असून आकर्षक रंगसंगतीने सजवलेला कक्ष लक्ष वेधून घेते. या कक्षाच्या भिंतीवर पशु, पक्ष्यांची चित्रे रंगविण्यात आली आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची रंगसंगती करण्यात आली आहे. बालकांचा विश्वास मिळवण्यासाठी तेथे समुपदेशन केले जाणार आहे.या बालस्नेही कक्षाचे उद्घाटन मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, मदन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा कैलास सत्यार्थी चिल्डन फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण मदन, सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे आदी या प्रसंगी उपस्थित होते. बालस्नेही कक्षात येणाऱ्या बालकांना विश्वास देऊन त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांनी सांगितले. पोलिस ठाण्यात काहीसे तणावपूर्ण वातावरण असल्याने सर्वसामान्यांना येथे भेट देताना धाकधुकच वाटते. परंतु, अल्पवयीन बालकांवरही विविध कारणांनी पोलिस ठाण्याला भेट देण्याची वेळ ओढावते. अशा प्रसंगांमध्ये पोलिस ठाण्यातील वातावरणाचा बालकांवर विपरीत परिणाम होऊ नये, त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होण्याच्या उद्देशाने बालस्नेही कक्ष उभारला असल्याचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण मदन यांनी सांगितले नवी दिल्लीतील कैलास सत्यर्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन व मदन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना यांच्या वतीने आणि पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिस ठाणे आवारात मुलांना सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी नाशिक ग्रामीणच्या मनमाड पोलिस ठाण्यात बालकांसाठी सर्व सोयीयुक्त स्वतंत्र बालस्नेही पोलिस कक्षाची स्थापना करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी सांगितले
स्वाती गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी ॲड. विद्या चव्हाण, गीतांजली पवार, तुषार सूर्यवंशी यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.













