जळगावः प्रत्येकाला शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी हवी असते. पण एका उच्चशिक्षित तरुणीने तब्बल नऊ कोटी रुपयांचे नोकरीचे पॅकेज नाकारत संन्यासाचा मार्ग निवडला आहे. ही कहाणी आहे, कल्याणी बोरा आताच्या संयमश्रीजी महाराज यांची. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी संन्यास घेतला आहे.
कल्याणी बोरा या पुण्यात बीबीएचं शिक्षण घेत होत्या. 2013 ला पुणे येथे जैन धर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर त्यांनी संन्याशी जीवन जगायचं निर्णय घेतला.
या निर्णयाला घरच्यांची परवानगी हवी होती. घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी त्यांना तब्बल आठ वर्षे थांबवावे लागले. अखेर त्यांना घरातून परवानगी मिळाल्यानंतर 9 डिसेंबर 2019 रोजी धर्मप्रचारासाठी वयाच्या 22 व्या वर्षी संन्यास घेतला. कल्याणी बोरा या आताचे संयमश्रीजी महाराज आहेत.
संयमश्रीजी महाराज म्हणजेच आताच्या कल्याणी बोरा यांचा संन्यास घेण्याअगोदरचा जीवन प्रवासही तसा रंजकच आहे. त्यांना एक भाऊ, एक बहीण आहे. त्या श्रीमंत परिवारातील आहेत.

पुण्यातून बीबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी वर्षाला तब्बल नऊ कोटींचे पॅकेज मिळणार होते. पण पैशाच्या मागे न लागता त्यांनी संन्यास घेणेच पसंत केले.
जीवनात पैसाच सर्व काही नसतो. आपल्या मनाचा आनंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी गुरुचरणी राहण्यासाठी मी पैशाचा विचार केला नाही. नऊ कोटी रुपये सोडले म्हणून सर्वांना आश्चर्य वाटतो. आताही मला त्याचा पश्चाताप होत नाही, अशी प्रतिक्रिया संयमश्रीजी महाराज यांनी दिली.












