नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव तालुक्यातील बोलठाण ते मनेगाव पाटी पर्यंत च्या रस्ता आजरोजी ची अवस्था ही अतिशय जीवघेणी झाली असून या रस्त्याने प्रवास म्हणजेच अपघाताला आमंत्रण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.आरोग्यसेवा,शैक्षणिक सेवा,बाजारपेठ यासारख्या सुविधा घेण्यासाठी हा रस्ता नेहमी वापरला जातो.

नांदगाव तालुका सार्वजनिक बांधकाम विभाग हद्दी पासून पुढे 3 किमी अंतराचा हा रस्ता कन्नड व वैजापूर तालुक्यात येतो सीमा हद्द व रस्त्याला नंबर नसल्याने हा रस्ता जिल्हा परिषद कडे ही दिसत नाही व सार्वजनिक बांधकाम विभागकडे ही दिसत नसल्याने मागील 20 ते 25 वर्षांपासून कुठलीही ही दुरुस्ती झाली नाही.

यासाठी प्रहार शेतकरी संघटना नांदगाव तालुका तसेच कन्नड व वैजापूर येथील प्रहार संघटनेकडून अन्नत्याग आंदोलन ही केले होते. दोन दिवस हे आंदोलन सुरू होते पण आश्वासनाव्यतिरिक्त दुसरी फलप्राप्ती नाही याव्यतिरिक्त मनेगाव,सहानगांव, खामगाव या गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी कडे रस्ता मागणी केली असून अजून पर्यंत प्रतीक्षा कायम असल्याने याकामासाठी कोणीतरी वाली म्हणून उभे राहावे होणारी गैरसोय टाळावी अशी एकमुखी मागणी होत आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर मनेगाव पाटी रस्ता झाला नाही तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्या पर्यंतची तयारी व मानसिकता असल्याचे समजते.हा रस्ता खराब असल्याने अनेक तरुणांचे विवाह मोडले तर अनेकांना फक्त रस्ता नसल्याने लग्नाला विराम लागले आहे.ही शोकांतिका आहे.













