शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ….सप्तशृंगी गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी
मनमाड : ( योगेश म्हस्के ) शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक प्रमुख उत्सव तसेच आदिशक्ती देवी मातेशी संबंधित व्रत आहे.हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.
शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते.दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.
आश्विन महिन्यात घटाच्या स्वरूपात देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय.
आज शारदीय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस त्यानिमित्ताने वणी येथील श्री सप्तशृंगी देवीच्या गडावरील मंदिर आज दोन महिन्यांनंतर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले , सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या कार्यालयात सकाळी सात वाजता देवीच्या चांदीच्या उत्सव मृर्तीची , देवीच्या अलंकारांचे पुजन नाशिक जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री श्री दादा भुसे यांनी सपत्निक केले. यावेळी मुख्यमंत्र्याच्या सुनबाई व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी सौ.वृषाली शिंदे याही याप्रसंगी उपस्थित होत्या. कार्यालयापासुन देवीची उत्सव मुर्ती आणि अलंकारांची वाजतगाजत मिरवणुक काढुन उत्सव मूर्तीची मंदिरामध्ये स्थापना करून अलंकाराने देवीचा शृंगार करण्यात आला, आज नवरात्रीच्या पहिल्या माळीला देवीचे नवरूपाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील भाविकांनी सप्तशृंगी गड येथे गर्दी केली होती.












